स्मार्ट कार्डसाठी जेष्ठ नागरिकांनी बस आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा

अलिबाग : दि.1 डिसेंबर 2020 पासून ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नागरिकांनी त्वरित नजीकच्या आगारातील संबंधित आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून स्मार्ट कार्ड नोंदणी करावी, असे आवाहन राज्य परिवहन, रायगड विभाग, पेणच्या विभाग नियंत्रक श्रीमती अनघा बारटक्के यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्यात येतात. सध्या करोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाला असल्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात येत आहेत. करोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना बस आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्या संबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्यामुळे या योजनेला दि.30 नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.