स्वदेस फाउंडेशनचे ग्रामविकासाचे कार्य उल्लेखनीय : आदिती तटकरे

अलिबाग : जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये आरोग्य, शिक्षण ,पाणी व शाश्वत उपजीविका या क्षेत्रातील स्वदेस फाउंडेशनच्या वतीने सुरु असलेले कार्य निश्चितच उल्लेखनीय असून याचा मोठा लाभ रायगड जिल्ह्याला झाला आहे, असे प्रशंसनीय उद्गार जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी काढले.

जिल्हा प्रशासन व स्वदेस फाउंडेशन यांच्यादरम्यान वेबेक्स ॲप द्वारे ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, स्वदेस फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे उपस्थित होते.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, स्वदेस फाउंडेशनने जास्तीत जास्त गावांमध्ये पाणी योजना राबवाव्यात, त्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल. निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी योजना बंद होत्या.

परंतू स्वदेस फाउंडेशनच्या सौर उर्जेवर आधारित असणाऱ्या योजना सुरळीत सुरू होत्या, त्यासाठी त्यांनी स्वदेसचे आभार मानले व जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील योजना सौर उर्जेवर कशा पद्धतीने करता येऊ शकतील, त्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा अभियंत्यांनी स्वदेसबरोबर समन्वयाने काम करावे, असे संबंधितांना निर्देश दिले.

निसर्ग चक्रीवादळादरम्यान शाळा व अंगणवाड्यांचे नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात स्वदेस फाउंडेशन विशेष प्रकल्प हाती घ्यावा, असेही पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी स्वदेस फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांना सुचविले.यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्वदेस फाउंडेशन च्या सर्व कार्यकर्त्यांच्या कामाचे कौतुक करून शासनाच्या सर्व विभागांच्या समन्वयाने स्वदेसबरोबर भविष्यामध्येही एकत्रितपणे काम करणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना रायगड जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रांताधिकारी, तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी स्वदेस बरोबर नियोजन करावे, अशा सूचना दिल्या. किसान क्रेडिट कार्ड, डेअरी व बचतगट फेडरेशन व बँक कर्ज याविषयी शासनाबरोबर समन्वय साधून स्वदेस फाउंडेशनने काम करावे, तसेच फेरीवाले व लहान उद्योजकांसाठी केंद्र सरकारकडून सुरु असणाऱ्या दहा हजार रुपये कर्ज सुविधा जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, ओडीएफ प्लस यावर स्वदेस बरोबर एकत्रित काम करण्याचे नमूद केले.

यावेळी स्वदेस फाऊंडेशनचे महाव्यवस्थापक तुषार इनामदार, निता हरमलकर व संचालक समीर डिसूजा यांनी स्वदेस फाउंडेशन च्या वतीने सुरु असलेल्या कार्याविषयी माहिती दिली व रिव्हर्स मायग्रेशन प्रकल्पाला शासनाच्या वतीने सहकार्य करण्याची विनंती केली. मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी स्वदेस फाउंडेशनच्या काम करण्याच्या पद्धती, येणाऱ्या अडचणी उपाययोजना व ग्राम विकास समिती तसेच स्वदेस ड्रीम व्हिलेज याबद्दल माहिती देऊन शासनाने यामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावे, अशी विनंती केली.

दि.2 ऑक्टोबर रोजी जास्तीत जास्त गावे हागणदारीमुक्त घोषित करून गावांमध्ये सामाजिक अंतर ठेवून वेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले व यामध्ये शासकीय यंत्रणेनेही सहभागी व्हावे, अशी विनंती केली.
स्वदेस फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी शेवटी सांगितले की, काजू प्रक्रिया, मत्स्यपालन व पर्यटन या तीन बाबींवर शासनाने जास्तीत जास्त लक्ष दिले तर रायगड जिल्हा सुजलाम-सुफलाम होऊ शकतो व या दृष्टीने नियोजन करुन स्वदेस ने कामाला सुरूवात केली आहे.

या ऑनलाईन बैठकीसाठी महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन व सुधागड येथील प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी तसेच स्वदेस फाऊंडेशनचे संचालक बिजोय चिरोमल, रंजिश कटाडीया, प्रदीप साठे, राहुल कटारिया उपस्थित होते. या ऑनलाईन बैठकीच्या तांत्रिक नियोजनाकरिता प्रवीण बोने यांनी सहकार्य केले.