पनवेल (संजय कदम) : नववर्ष स्वागत डीजे, नाचगाणे, पार्टी अश्या आधुनिक पद्धतीने सर्वत्र करण्यात येतो मात्र रोटेरियन महिलांनी या सर्व गोष्टींना छेद देत पनवेलमध्ये नववर्ष मराठमोळ्या पद्धतीने साजरा केला.
भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रोटेरियन महिलांनी फॅशन शोच्या मार्फत आपल्या महाराष्ट्रच्या संस्कृतीचा देखावा करत हातात भगवे झेंडे आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे लोगो आणि त्याबद्दल असलेली माहिती लोकांना करून दिली. रोटेरियन महिलांनी केलेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
रोटरी क्लब ऑफ पनवेल आणि पनवेल महानगरपालिका यांच्यावतीने पनवेल फेस्टीव्हलचे आयोजन खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळील सिडको मैदानात करण्यात आले होते. यावर्षी पनवेल महानगरपालिका स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेल रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याअंतर्गत फॅशन शोच्या मार्फत रोटेरियन महिलांनी आपल्या महाराष्ट्रच्या संस्कृतीचा देखावा करत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बद्दल माहिती दिली. यामध्ये सहभागी घेतलेल्या सर्व महिला या डॉक्टर, टीचर्स तसेच विविध सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी आपल्या घरकामातून तसेच खाजगी कामातून वेळ काढून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांच्या हस्ते सहभागी सर्व महिलांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाची संकल्पना अथर्व मीडिया वर्ल्डचे मिलिंद राणे यांनी मांडली होती. तसेच कार्यक्रमाचे निवेदक किरण राजपूत यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या उपलब्धीची माहिती दिली.