कर्जत (गणेश पवार) : नेरळ येथील हुतात्मा स्मारक समिती यांच्या माध्यमातून दिले जाणारे हुतात्मा गौरव पुरस्कार यावर्षी जेष्ठ कवी आणि निवेदक अरुण म्हात्रे आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्ट यांना देण्यात येणार आहे. दोन जानेवारी रोजी हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या सिद्धगड बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हुतात्मा गौरव पुरस्काराचे वितरण केले जाते.
रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लब यांचा उपक्रम असलेल्या हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने नेरळ येथील हुतात्मा चौकात हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचा स्मृतिदिन सिद्धगड बलिदान म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन सभा आयोजित केली जाते.
हुतात्मा चौक येथे दोन जानेवारी रोजी सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या दोन व्यक्ती किंवा संस्था यांचा सन्मान हुतात्मा गौरव पुरस्कार देवून केला जातो. या वर्षी आघाडीचे कवी आणि निवेदक संपादक अरुण म्हात्रे आणि कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात सामजिक काम करणाऱ्या नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्ट यांचा सन्मान होणार आहे.
श्री साया ट्रस्टकडून अध्यद गणेश अय्यर आणि संचालिका राधिका घुले या पुरस्कार स्वीकारणार आहेत. या दोन्ही पुरस्कारांची घोषणा हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने करण्यात आली आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ आणि झाडाचे रोप असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दोन जानेवारी रोजी हुतात्मा चौकात आयोजित होणाऱ्या सिद्धगड बलिदान दिनाच्या कार्यक्रमात कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड,नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी,उपसरपंच मंगेश म्हसकर,नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यात हुतात्मा गौरव पुरसकाराचे वितरण होणार असून सुरुवातीला नेरळ मधील हाजी लियाकत इंग्लिश मिडीयम स्कूल चे विद्यार्थी सिध्दगड बलिदानाचा रणसंग्राम हे नाटक सादर करणार आहेत.