कोलाड (श्याम लोखंडे ) : सदरची घटना कोलाड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मौजे वरसगाव, ता. रोहा येथील रेस्टॉरंट व लॉजिंग येथे दि. २१/०२/२०२० ते २६/०२/२०२० चे दरम्यान घडलेली आहे.
सदर घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला आपल्या हॉटेलमध्ये कामावर ठेवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल होता.
वरील घटनेची फिर्याद कोलाड पोलीसानी घेतली व भा.द.वि.सं. कलम ३७६ (एन), ३७६ (३), ५०६ सह पोक्सो कलम ४,६,८ अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्हयाचा तपास पी. एस. तायडे, सहा. पोलिस निरीक्षक, कोलाड पोलिस ठाणे यांनी केला व आरोपींविरूद् न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
सदर खटल्याची सुनावणी मा. विशेष न्यायालय, माणगाव – रायगड येथे झाली व सदर गुन्हयात पिडीत मुलीची साक्ष व वैद्यकिय पुरावा महत्वाचा ठरला. सदर खटल्यामध्ये सहा सरकारी वकील श्री. योगेश तेंडूलकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले व कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले.
सदर केसच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी यु.एल. घुमास्कर, पोलिस उपनिरीक्षक, सौ. छाया कोपनर मपोह १०२, शशिकांत कासार, पोह ९१३ व पो.ह. ८७९ शशिकांत गोविलकर यांनी सहकार्य केले. मा. विशेष व सत्र न्यायाधीश श्री. हर्षल कि. भालेराव यांनी सदर घटनेतील गुन्हयाच्या शाबीतीनंतर आरोपीस दोषी ठरवून दि. ०७/१२/२०२२ रोजी २० वर्ष सक्तमजूरी व रु. २,६५,०००/- दंडाची शिक्षा ठोठावली.