२००८च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचा भारताकडे प्रत्यार्पणास विरोध

lokmat6

वॉशिंग्टन : मुंबईत २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील मुख्य आरोपी व मूळचा पाकिस्तानी असलेला कॅनडाचा व्यावसायिक तहव्वूर राणा याने त्याचे भारतात  प्रत्यार्पण करण्यास विरोध केला  आहे. ज्या गुन्ह्यासाठी त्याचे  प्रत्यार्पण करण्याचे अपिल  करण्यात आले आहे, त्यात त्याला आधीच मुक्त केले आहे, असा त्याचा दावा आहे.

डेव्हिड कोलमन हेडलीचा बालमित्र राणा (वय ५९)याला मुंबई हल्ल्यातील भूमिकेबद्दल प्रत्यार्पित करावे, या भारताच्या   मागणीवरून १० जून रोजी लॉस एंजेलिसमधून दुसऱ्यांना गजाआड करण्यात आले. मुंबई हल्ल्यात ६ अमेरिकी नागरिकांसह एकूण १६६ जणांचा मृत्यू झाला  होता.

मुंबई हल्ल्याचा कट रचणाऱ्यांमध्ये लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी-अमेरिकी अतिरेकी हेडली सामील होता. त्याला या प्रकरणात सरकारी साक्षीदार बनविण्यात आले आहे. सध्या तो यासाठी अमेरिकेतील जेलमध्ये ३५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहे.

विरोध करणारी याचिका
राणाच्या वकिलांनी मागील आठवड्यात लॉस एंजिलिसच्या जिल्हा न्यायालयात न्यायाधीश जॅकलिन कॅलोनियन यांच्यासमोर प्रत्यार्पणाला
विरोध करीत याचिका दाखल केली होती.
राणाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले होते की, भारत-अमेरिका प्रत्यार्पण कराराच्या कलम ६ नुसार राणाला भारतात प्रत्यार्पित करता येऊ शकत नाही.
कारण ज्या गुन्ह्यांसाठी  त्याचे प्रत्यार्पण करावे, असे  म्हटले जात आहे, त्यातून त्याला आधीच मुक्त करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे कलम ९ नुसारही त्याला प्रत्यार्पित केले जाऊ शकत नाही. कारण, सरकारने गुन्ह्यांत राणा गुंतला असल्यावर विश्वास ठेवण्यायोग्य कारणे सांगितलेली नाहीत.