ठाणे : थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानला जाण्यासाठी एमएमआरडीए ‘फ्युनिक्युलर रेल्वे’ सुरू करणार आहे. याबाबत केंद्र शासन अंगीकृत मे. राइट्स या संस्थेने तयार केलेल्या सुसाध्यता अहवालानुसार माथेरानची प्रस्तावित रेल्वे फ्युनिक्युलरची उंची ५५० मीटर राहणार आहे.
माथेरान ते धोडनी मार्गावर ती धावणार असून, नवी मुंबईला जोडण्यात येणार आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर तिच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली. यामुळे लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून निविदा मागवून कार्यवाहीचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
माथेरानला जाण्यासाठी रस्ता किंवा रेल्वेने ( नेरळ-माथेरान) हा एकमेव मार्ग आहे. या थंड हवेच्या ठिकाणाला नवी मुंबईच्या दिशेने जोडण्यासाठी एमएमआरडीएने सर्वप्रथम २००९ साली मान्यता दिली होती. त्यानंतर, सुसाध्यता अहवाल तयार करण्यासाठी मे. राइट्स या संस्थेची नियुक्ती केली. तिच्या अहवालानुसार, माथेरान ते धोडनी मार्गावरील १.९ किमीच्या घनदाट वनांमधून ती ५५० मीटर उंचीवरून धावणार असून, तिचा खर्च भारतीय चलनानुसार १०२ कोटी ९७ लाख, तर विदेशी चलनात १९५ कोटी चार लाख प्रस्तावित केला आहे.