“अजुन किती दिवस अशी स्वतः ला कोंडून बसणार आहेस?”
राहुलने विद्याला विचारले..
विद्या तिच्याच विचारात खिडकीतून बाहेर बघत बसली होती… तो प्रसंग आठवला की अजूनही तिच्या अंगावर सरसरून काटा उभा राहतो…
रात्रीची वेळ.. ऑफिस मध्ये काम करताना उशीर झाला.. आणि विद्याची घरी जायची शेवटची बसही निघुन गेली.. रिक्षा शोधत असताना एकाने सभ्यपणाचा आव आणून “मी पण तिकडेच चाललो आहे.. सोडतो तुम्हाला…!” असं खोटं सांगून तिला आडवाटेला नेऊन तिच्या सोबत बळजबरी केली.. तिच्या शरीराचे लचके तोडले.. तिच्या भावनांचा छळ मांडला.. तिच्या ओरबाडलेल्या देहाला भर रस्त्यात तसंच फेकून तो नराधम पळून गेला.. !
ती कशीबशी घरी पोहोचली.. पोलिसांना सांगायला तिच्याकडे काहीच ठोस नव्हतं.. ना गाडीचा नंबर.. ना त्याचा खरा चेहरा..
तिच्या देहाचे लचके तोडताना तो एका हिंस्त्र पशुसारखाच दिसत होता.. ती नीट काहीच सांगू शकली नव्हती पोलिसांना.. आणि म्हणूनच तो मोकाट फिरत होता..
आणि सहन करत होती.. विद्या..!
बाहेर पडल्यावर लोकांच्या नजरा विचारायच्या तिला खुप प्रश्न..
‘लाज कशी नाही वाटत.. इज्जत लुटवून आली तरी?’
‘बाहेर कशी काय पडलीस?’
‘आता उरलंय काय तुझ्यात??’
“तुझं पावित्र्य तर गमावून बसलीस..!”
‘आता परत कोणत्या तोंडानी समाजात वावरणार?’
करणारा क्षणात करून जातो.. पण विद्या सारख्या कित्येक जणी आहेत.. ज्या त्या काही क्षणांची किंमत आयुष्यभर मोजत असतात..
त्या प्रसंगा नंतर विद्याचं ठरलेलं लग्नही मोडलं… तो मुलगा म्हणाला…”तुझं पावित्र्य संपलं…!”
तेव्हा पासून विद्याने स्वतः ला ह्या खोलीत बंद करून घेतलं होतं.. आणि राहुल – तिचा लहानपणीचा मित्र- तिला रोज समजवायचा.. तिने बाहेर पडावं, आपलं आयुष्य सुरु करावं म्हणून तिला समजवायचा..
पण तिच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळतच नव्हतं…
“पावित्र्य नेमकं कशात असतं? मनात? की शरीरात???”
आज विद्या सारखा प्रश्न अनेक मुलींना पडलेला आहे.. आणि आपली, ह्या समाजाची नैतिक जबाबदारी आहे.. की ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना आपल्या वागणुकीतुन द्यावं..
अशा सर्व मुलींना नक्की सांगायला हवं.. की “कोणी जबरदस्ती केल्याने त्याचं काहीच कमी झालेलं नाही… ना त्यांच्या मनाचं पावित्र्य.. ना त्यांच्या शरीराचं पावित्र्य… उलट त्यांच्यात लढण्याची ताकद वाढली आहे.. पावित्र्य शरीराच्या एखाद्या भागात नाही.. बघणाऱ्याच्या नजरेत असतं…त्यामुळे खचून न जाता पुढील आयुष्य अजुन जोमाने जगायला हवं…”
-के. एस. अनु