नववीच्या फेरपरीक्षेतही अनेक विद्यार्थी नापास, शिक्षणमंत्र्यांकडे पालकांची तक्रार

मुंबई : नववी आणि अकरावीतील नापास विद्यार्थी फेरपरीक्षेतही नापास झाले आहेत. दादर पूर्व येथील एका नामांकित कॉन्व्हेंट शाळेने नववीच्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेत नापास केले आहे. याप्रकरणी काही पालकांनी शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यूपीएससी परीक्षेसारखे नववीच्या नापास विद्यार्थ्यांना या शाळेने 20 मिनिटात 40 प्रश्न सोडविण्यास सांगितले.

परीक्षा देताना विद्यार्थी थोडे हलले तरी कॉपी समजून संध्याकाळी परत फेरपरीक्षा घेतली गेली व विद्यार्थ्यांना पुन्हा नापास करण्यात आले असा आरोप पालकांनी केला आहे. याप्रकरणी पालकांनी शिक्षक परिषदेकेडेही शाळेविरोधात तक्रार केली असल्याचे शिक्षक परिषदेचे शिवाय दराडे यांनी सांगितले. नववी, दहावीच्या नापास विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात पाठवावे अशी मागणी पालकांनी केली होती. मात्र शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेऊन पुढील वर्गात पाठवावे असे पत्र काढले होते.