कर्नाळा बँकेच्या स्थापनेपासून घोटाळ्याची चौकशी करावी; पनवेल संघर्ष समिती

kadu1

मुंबई : कर्नाळा बँक घोटाळा केवळ 2019 मध्ये झालेला नाही तर बँकेच्या स्थापनेपासूनच ठेवीदारांच्या पैशाचा अपहार करून तत्कालीन संचालक मंडळ, शेकापचे प्रमुख पदाधिकारी आणि काही उद्योजकांनी बँक लुटण्याचा कट रचून अखेर बँक बुडित काढल्याने 1996 पासूनचे ऑडिट करून घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी करताच, सहकार आणि पणन खात्याचे अपर सचिव अरविंद कुमार यांनी तत्वत: मान्यता दिली.

कांतीलाल कडू यांनी आज कर्नाळा बँक ठेवीदारांचा लढा अधिक तीव्र करताना अरविंद कुमार यांची मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरील त्यांच्या दालनात बैठक घेवून ही मागणी लावून धरली. त्यावेळी झालेल्या विस्तृत चर्चेत कर्नाळा बँक घोटाळ्याबाबत सर्वंकष चर्चा केली.

राज्य सरकारने ठेवीदारांच्या पैशाची हमी घ्यायला हवी, असा युक्तिवाद अरविंद कुमार यांनी व्यक्त केला. त्यांचे स्वीय सहाय्यक राहुल. शिंदे यांना आदेश देताना सांगितले की, सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडून तातडीने यासंदर्भात माहिती मागवून घ्यावी. तसेच डिपॉझिट इन्शुरन्स आणि रिझर्व्ह बँकेला स्मरणपत्र देवून बँके अवसानायात काढण्याबाबत आणि ठेवीदारांना देण्यात येणाऱ्या इन्शुरन्स रक्कमेबाबत काय स्थिती आहे. याबाबत अहवाल तातडीने मागवून घेण्यास सुचित केले.
महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार कलम 188 प्रमाणे उपजिल्हा निबंधक विशाल जाधव यांच्या कार्यवाहीचा अहवाल घेवून दोषारोप पत्र अद्याप का सादर केले गेले नाही याचाही खुलासा मागविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

कर्नाळा बँकेचा पैसा, बोगस कर्ज, ओव्हर डाफ्ट आणि इतर कारणांसाठी तत्कालीन संचालकांनी सुरुवातीपासून वापरला असल्याने घोटाळा आता उघडकीस आला असला तरी ठेवीदारांच्या पैशावर अनेकांनी एकत्रितपणे डल्ला मारला असल्याचा आरोप कांतीलाल कडू यांनी करून काही पुरावे अरविंद कुमार यांना सादर केले.

पुढच्या आठवड्यात पुन्हा सर्व अहवाल घेवून बैठक घेण्याचे आश्वासन आणि ठेवीदारांना तातडीने डीआयसीकडून पैसे परत मिळवण्यासाठी नक्की सहकार्य करेन अशी अरविंद कुमार यांनी ग्वाही दिली.

चर्चेत सहकार खात्यातून अरविंद कुमार, राहुल शिंदे यांनी तर पनवेल संघर्ष समितीकडून अध्यक्ष.कांतीलाल कडू, नावडे विभागीय अध्यक्ष योगेश पगडे, तळोजा विभागीय अध्यक्ष सुनील भोईर आदींनी सहभाग घेतला होता.