प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री शशिकला जावळकर यांचं निधन

shashikala

मुंबई :  ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ या सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात भूमिका साकारलेल्या प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री शशिकला जावळकर यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं. आज (दि. 4 एप्रिल) दुपारी 12 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमधील 2 दशकं गाजवली. मुख्य अभिनेत्री, खलनायिका, आई अशा वेगवेगळया प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. जवळपास 100 पेक्षा जास्त सिनेम्यांमध्ये त्यांनी काम केलं. त्यांच्या निधनामुळं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक बडया अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी त्यांना सोशल मीडियाव्दारे श्रध्दांजली वाहिली आहे.

अनेक ख्यातनाम निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं आहे. एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून त्यांना बॉलिवूडमध्ये ओळखलं जात होतं. प्रामुख्यानं त्यांचे ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नौ दो ग्यारह’, ‘जंगली’, ‘कानुन’, ‘अनपढ’, ‘हरियाली और रास्ता’, ‘वक्त’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘सरगम’, ‘हमजोली’, ‘बादशहा’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘चोरी चोरी’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ हे सिनेमे सुपरहिट ठरले होते. सन 2005 पर्यंत त्या बॉलिवूडमध्ये सक्रिय होत्या.