अभिनेत्री जुही चावलाची 5G विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळत ठोठावला 20 लाखांचा दंड

juhe

नवी दिल्ली : अभिनेत्री जुही चावला मागील अनेक वर्षांपासून मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या हानीकारक रेडिएशनविरोधात नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तिने याबाबत न्यायालयाचे दारही ठोठावले. भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात जुही चावलाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. पब्लिसिटीसाठी ही याचिका असल्याचे सांगत जुही चावलाला न्यायालयाने 20 लाखांचा दंड ठोठावला आहे.

याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले आहे की, फिर्यादींनी कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केल्यामुळे फिर्यादीवर 20 लाख रुपयांचा दंड लावण्यात येत आहे. हे प्रसिद्धीसाठी होत असल्याचेही दिसत आहे. सोशल मीडियावर जुही चावला यांनी सुनावणीची लिंक प्रसारित केली, असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती जे. आर. मिधा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, चावला यांनी सोशल मीडियावर सुनावणीची वेब लिंक प्रसारित केली. हे लक्षात घेता प्रसिद्धीसाठी हा दावा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले.

जुही चावलाने मागील सुनावणीच्या आधी स्वत: ट्विट करुन लोकांना या सुनावणीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सुनावणीदरम्यान एका फॅननं थेट जुही यांच्या चित्रपटातील गाणे गाण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे न्यायमूर्ती संतापले होते. त्यांनी थेट दिल्ली पोलिसांना सांगून अशा लोकांना शोधून त्यांना नोटीस देऊन आणि त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई करु असा इशारा दिला होता.

या सुनावणीच्या सुरुवातीपासूनच व्यत्यय येत होता. काही लोक सुरुवातीला ‘जुही मॅम कुठे आहेत? मला जूही मॅम दिसत नाहीत, असे विचारत होते. यानंतर एकाने जुही चावलाने अभिनय केलेल्या चित्रपटामधील गाणे गायला सुरुवात केली होती. यावर खटल्याची सुनावणी करणारे न्यायमूर्ती जे. आर. मिधा यांनी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना संबंधित व्यक्तीला शांत करण्यास सांगितले होते. त्यांनी थेट दिल्ली पोलिसांना सांगून अशा लोकांना शोधून त्यांना नोटीस देऊन आणि त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई करु असा इशारा दिला होता.