राज्यातील देवस्थान कमिट्यांवर गुरव समाजाला प्रतिनिधित्व द्या – बंडू खंडागळे

gurav-samaj

पेण (राजेश प्रधान ) : राज्यातील पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पंढरपूर विठ्ठल रखुमाई देवस्थान समिती, आणि शिर्डी साईबाबा देवस्थान समितीवर गुरव समाजाला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रताप गुरव यांनी नुकतीच राज्य सरकारकडे केली आहे. या अनुषंगाने गुरव समाज रायगड, ठाणे, मुंबई, संस्थेचे खजिनदार बंडू खंडागळे यांनी सुध्दा निवेदनाद्वारे राज्य सरकार कडे मागणी केली आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जिल्ह्यातील सुमारे 3500 मंदिर येतात. यातील बहुतांश मंदिराची पूजा अर्चा देखबाल वंशपरंपरेने गुरव समाज करीत आहे. मागील युती सरकारचा कार्यकाळ वगळता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती वर आणि पंढरपूर विठ्ठल रखुमाई मंदिर समिती मध्ये गुरव समाजाला प्रतिनिधित्व मिळाले होते. याही वेळी या तीनही देवस्थान समितीवर गुरव समाजाचा एक प्रतिनिधी घ्यावा अशी आग्रही मागणी गुरव समाज रायगड, ठाणे, मुंबई, संस्थाने केली आहे.

rajesh2

महाराष्ट्रामध्ये 40 लाखाहून जास्त बलुतेदार गुरव समाजाची लोकसंख्या आहे. त्यांचा पारंपारिक उदरनिर्वाहाचा मार्ग ग्रामदेवतांची पूजा, अर्चा, साफसफाई दिवाबत्ती करणे हा आहे. या मंदिराची पूजा अर्चा साफसफाई दिवाबत्ती करून भाविकांकडून मिळणाऱ्या दक्षिणेतून व बलुतेदार पद्धतीने गावातून मिळणाऱ्या शिधा व वार्षिक पेंडी काडीचे बलुते बलुते त्यातून बलुतेदार गुरव समाजाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

राज्यात 41000 हजारांपेक्षा जास्त मंदिरे आहेत. यामध्ये देवस्थान इनाम जमीन असलेली मंदिरे 18387 आणि ग्रामदेवतेची इतर मंदिर संख्या 22623 आहे. गुरव समाज हा इसवी सन 6 व्या 7व्या शतकापासून गाव वाड्यातील एक बलुतेदार घटक म्हणून गावच्या सेवे पोटी ग्राम देवतांची पूजा अर्चना मंदिर साफसफाई, दिवाबत्ती, अशी सेवा करून देवा समोर येणाऱ्या किरकोळ दान दक्षिणेवर आणि घरोघरी जाऊन मागितलेल्या पीठ, मीठ, कोरडा शिधा, व वर्षाकाठी शेतकरी बांधवाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या बलुत्यावर वर्षानुवर्षे गावात सुख-शांती ऐश्वर्य शांतता नांदावी म्हणून देवतांची मनोभावे पूजा करून गावाचे भले होवो. अशी मनोभावे प्रार्थना करून गुरव समाज जगत आहे.

परंतु बलुतेदारांची इतर सर्वच दैनंदिन मिळकतीचे व्यवसाय कोरोना महामारीमुळे बंद झाल्यामुळे हा समाज दुहेरी संकटात सापडलेला आहे. अशा दुहेरी आर्थिक अडचणीत सापडलेल्या गावगाड्यातील बलुतेदार गुरव समाजाला महाराष्ट्र राज्य शासनाने आर्थिक मदत करावी ही मागणी देखील अद्यापही प्रलंबित आहे. या मागणीचा महा विकास आघाडी सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव गुरव त्याचबरोबर अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांनी यापूर्वीच राज्य सरकारकडे केलेली आहे. तरी येत्या काळात निश्चितच या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून गुरव समाजाचे असलेले प्रश्न मार्गी लावण्याबाबत शासनाकडून सहकार्य व्हावे

अशी मागणी निवेदनाद्वारे गुरव समाज रायगड, ठाणे, मुंबई, संस्थेचे खजिनदार बंडू खंडागळे यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारला केली आहे.