पावसाचे धुमशान ! प्लॅटफॉर्मच्या उंचीपर्यंत गाठले पाणी; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

rain-water10

मुंबई : मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे त्याच बरोबर बुधवारी रात्री  ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊसाने सर्वांची दाणादाण करून टाकली आहे. झालेल्या पावसाने मध्य रेल्वेच्या उंबरमाळी आणि कसारा स्थानकारदरम्यान, तसंच अंबरनाथ आणि वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं लोकल सेवा थांबवण्यात आली.

दिलेल्या माहितीनुसार कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा या दोन्ही मार्गावरील वाहतुकीला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. कसारा परिसरात केवळ ४ तासांमध्ये १३९ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे उंबरमाळी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी साचल्याचं दिसून आलं आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

याशिवाय कसारा येथेही ट्रॅकवर पाणी साचलं असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, बुधवारी रात्री सव्वादहा वाजल्यापासून इगतपुरी ते खर्डीदरम्यानची वाहतूकही थांबवण्यात आली असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मुंबईतही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूककोंडी झाली होती. मालाड आणि जोगेश्वरीच्या सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या होत्या. तर पूर्व द्रुतगती महामार्ग आणि विलेपार्ले ते वांद्रे या भागामध्येही मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर परिणाम झाला होता.