New Delhi : आजपासून जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचं आंदोलन

farmer

नवी दिल्ली : आजपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन करणार आहेत. पावसाळी अधिवेशन चालू असतानाच सरकारने आंदोलनासाठी परवनगी दिली आहे. केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीतल्या जंतर- मंतरवर आंदोलन करणार आहेत. त्यानुसार शेतकरी आजपासून म्हणजेच 22 जुलैपासून ते 9 ऑगस्टपर्यंत आंदोलन करतील. आंदोलनासाठी वेळही देण्यात आली आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही वेळ असेल. काही अटींवर दिल्ली आपत्ती व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना आंदोलनासाठी परवानगी दिली आहे.

गुरुवारपासून सुरू होणार्‍या शेतकर्‍यांच्या या आंदोलनात 200 हून अधिक शेतकरी सहभागी होऊ शकणार नाहीत. यासह, त्यांना कोरोना प्रोटोकॉलची देखील काळजी घ्यावी लागेल. वृत्तसंस्था पीटीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांकडून निदर्शनास परवानगीही मिळाली आहे. असे सांगितले जात आहे की, पोलिस एस्कॉर्टमध्ये शेतकऱ्यांना सिंघु सीमेपासून जंतर-मंतर येथे नेले जाईल. विशेष बाब म्हणजे यावेळी संसदेचे पावसाळी अधिवेशनही चालू आहे जे 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

दरम्यान सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे विरोधक सरकारला शेतकरी आंदोलनावरुनही घेरण्याचा प्रयत्न करतील. महागाई, कोरोना महामारी आणि कोरोनाने होणारे मृत्यू अशा विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेत केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात आता शेतकरी आंदोलनाचीही भर पडेल.

मंगळवारी शेतकरी संघटनांनी दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यानंतर, पावसाळी अधिवेशनात जंतर-मंतर येथे किसान संसद आयोजित करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले होते. या दरम्यान ते शांततेत निषेध नोंदवतील आणि कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करतील. यावेळी कोणताही निदर्शक संसदेत जाणार नाही. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सिंघू सीमेवरून शेतकऱ्यांना जंतर-मंतर येथे आणले जाईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.