पोलीस दलात प्रचंड खळबळ ! 25 लाखाची बेहिशोबी रोकड सापडली उप अधीक्षकाच्या घरात, ACBची कारवाई !

acb

मुंबई : परभणी येथील सेलू उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससेमिरा लागला आहे. अपघात प्रकरणात दोन कोटी रुपयांची लाच मागून तडजोडीत दीड कोटी रुपये घेण्याचे पाल याने कबूल केले होते. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  एका पोलीस कर्मचाऱ्याला 10 लाख रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडले होते. या कारवाईनंतर राजेंद्र पाल याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये लाखो रुपयांची रोकड आणि महत्वाचे कागदपत्र जप्त करण्यात आले आहेत.

लाचखोर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल याच्यावर एसीबीने कारवाई केली. यानंतर त्याच्या मुंबईतील फ्लॅटची झडती घेण्यात आली. झडतीमध्ये त्याच्या घरातून तब्बल 24 लाख 84 हजार रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याचे व कुटुंबातील सदस्यांचे बँक व्यवहार व अन्य मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

2 कोटी लाचेची मागणी करुन 10 लाखाचा पहिला हप्ता घेताना पाल व त्याच्या ऑर्डली कॉन्स्टेबल गणेश चव्हाण यांना एसीबीने शुक्रवारी (दि.23) परभणीतील  सेलू विभागाचे उपविभागीय पोलीस कार्यालयात अटक केली. पाल याची अनेक वर्षे मुंबईत सेवा झाली आहे. पाल पदोन्नतीवर परभणीला बदली होण्यापूर्वी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात  वरिष्ठ पोलीस निरीक्षक होता.

राजेंद्र पाल  याचे कुटुंब मुंबईत राहत असून पाल याच्यावर कारवाई केल्यानंतर एसीबीच्या पथकाने शनिवारी सकाळपासून त्याच्या पश्चिम उपनगरातील फ्लॅटची झडती घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी पाल याच्या घरात 24.84 लाख रुपये मिळाले. तसेच बँकेची पासबुके व इतर मालमत्तेची दस्तऐवज जप्त केली. त्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेची सविस्तर चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण………….

सेलू पोलीस ठाण्यांतर्गत 3 मे 2021 रोजी एका अपघात प्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मयताच्या पत्नीसोबत तक्रारदाराची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. 9 जुलै रोजी सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदारास त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. ‘तुझी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे. यातून तुला बाहेर पडायचे असेल तर मला दोन कोटी रुपये द्यावे लागतील’ असे सांगितले. तसेच कार्यालयात वारंवार बोलावून व फोन करुन अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली.

उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी करुन तडजोडीत 1 कोटी 50 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रारदाराच्या भावाकडून उपविभीगाय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांच्या कार्यालयाशी संलग्न मानवत पोलीस ठाण्यातील  पोलीस कर्मचारी गणेश लक्ष्मणराव चव्हाण  यांना 10 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.