आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी तरी साधना करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

kolad14

कोलाड (श्याम लोखंडे) : अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते. भगवान श्रीकृष्णाने ‘न मे भक्तः प्रणश्यति’, म्हणजे ‘माझ्या भक्तांचा कधी नाश होणार नाही’, असे वचन भक्तांना दिले आहे. त्यामुळे आपण साधना वाढवून देवाचे भक्त बनायला हवे. यापूर्वी आनंदप्राप्तीसाठी साधना करा, असे आम्ही सांगत होतो; मात्र येणारा आपत्काळ इतका भीषण असणार आहे की, आता जिवंत राहण्यासाठी साधना करा, अशी वेळ आली आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवा’त मार्गदर्शन करत होते. ते पुढे म्हणाले की, साधनेसंदर्भात सनातन संस्थेच्या वतीने साप्ताहिक ‘ऑनलाईन साधना सत्संग’ घेण्यात येतात. याचा सत्संगांचा जिज्ञासूंनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही सद्गुरु जाधव यांनी केले.

विश्वभरातीलजिज्ञासूंसाठी यंदा  11  भाषांमध्ये ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न झाले. या महोत्सवांचा प्रारंभ श्री व्यासपूजन आणि श्री गुरुपूजन यांद्वारे झला. या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. तसेच परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांनी यापूर्वी केलेल्या मार्गदर्शनांची संग्रहित ध्वनीचित्रफित आणि ‘आपत्काळाच्या दृष्टीने करावयाची सिद्धता’ या विषयावरील ध्वनीचित्रफितही दाखवण्यात आली. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता सांगणारी प्रात्यक्षिके (बचाव आणि आक्रमण) या महोत्सवाचे आकर्षण ठरले. सनातन संस्थेचे संकेतस्थळ,  तसेच ‘हिंदुजागृती’ हे संकेतस्थळ आणि यू-ट्यूब चॅनेल यांद्वारे या कार्यक्रमाचा लाभ 90 हजारांहून अधिक जिज्ञासू आणि साधक यांनी घेतला.

सद्गुरु जाधव पुढे म्हणाले की, सध्या भारतासह संपूर्ण पृथ्वी संकटकाळातून जात आहे. या वर्षभरात पूरस्थिती, दंगली, महामारी, आर्थिक मंदी इत्यादी संकटांचा परिणाम देशाला भोगावा लागला. वर्ष 2020 ते 2023 हा काळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी आपत्तींचा काळ असणार आहे. या काळात आर्थिक मंदी, गृहयुद्ध, सीमापार युद्ध, तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांचा सामना जनसामान्यांना करावा लागेल. अशा आपत्काळात जिवंत रहाणे आणि सुसह्य जीवन जगणे, हे एक आव्हान ठरणार आहे. आपत्काळाच्या दृष्टीने स्वसंरक्षण, प्रथमोपचार, अग्निशमन प्रशिक्षण, जलतरण, वाहन चालवणे आदी विविध प्रकारच्या विद्या शिकण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे.

सनातन संस्थेचे ग्रंथ आता  ‘ई-बुक’  स्वरूपात ‘अमेझॉन किंडल’ यावर उपलब्ध झाले आहेत. यापैकी ‘त्योहार मनाने की उचित पद्धतियां एवं अध्यात्मशास्त्र’ या हिंदी भाषेतील पहिल्या ‘ई-बुक’चे प्रकाशन ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाचे माजी समूह-संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यांसह हिंदी, इंग्रजी आणि कन्नड या भाषांतील अन्य 8 ग्रंथांचेही प्रकाशन या महोत्सवांत यावेळी करण्यात आले.