पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक ठप्प, लोखंडी साहित्य घेऊन जाणारा कंटेनर उलटला !

express

पुणे : पुण्याहून मुंबईच्या दिशेने लोखंडी साहित्य घेऊन जाणारा कंटेनर उलटल्याने पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. कंटेनरमधील लोखंडी साहित्य महामार्गावर पडल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. हा अपघात घाट परिसरात आज (शनिवार) दुपारच्या सुमारास झाला असून महामार्गावरील साहित्य बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने लोखंडी सामान घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाचे अमृतांजन ब्रिज जवळील घाट परिसरात गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर महामार्गावर उलटला. कंटनेरमध्ये असलेले लोखंडी साहित्य महामार्गावर पडल्याने पुण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महामार्गावर दोन ते तीन किलोमिटरच्या रांगा लागल्या आहेत. तर वाहन चालकांनी आपली वाहने मुंबई लेनच्या दिशेने वळवल्याने मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक मंदावली आहे.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनरमधील लोखंडी साहित्य महामार्गावर पडल्याने पुणे-मुंबई लेनवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यातच मुसळधार पाऊस पडत असल्याने मदत कार्यात विलंब होत आहे.