साखरचौथच्या  सुकेळीच्या राजाला भक्तिभावाने निरोप

dinesh5

सुकेळी ( दिनेश ठमके) : रोहा तालुक्यातील सर्वच साखरचौथच्या बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. नागोठणे जवळच असलेल्या सुकेळी येथिल साखरचौथच्या सुकेळीच्या राजाला शनिवारी सायंकाळी ७ वाजता वाजत-गाजत भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला.अंत्यत शांततापूर्ण व उत्साही वातावरणात खैरवाडी नदिवरील विसर्जन घाटावर भक्तिभावाने सुकेळीच्या राजाला निरोप देण्यात आला.

अंनत चतुर्दशीच्या गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर सर्वांनाच ओढ लागते ती लगेचच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी येणाऱ्या साखरचौथच्या गणपती बाप्पांची. यावर्षीसुद्धा साखरचौथच्या गणपती बाप्पाचे सुकेळी गावामध्ये जोरदार आगमन करण्यात आले. यावर्षीचे सुकेळी गावातील साखरचौथच्या गणपतीचे  ४ थे वर्षं आहे. शुक्रवार दि.२४ सप्टेंबर रोजी सर्व सुकेळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत गणपती बाप्पाचे आगमन व प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्याचप्रमाणे सांय.७ वाजता महाआरती झाल्यानंतर रात्री ९.३० वा. हेदवली महिला मंडळाच्या पारंपारिक नाचाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यानंतर शनिवार दि.२५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सुकेळीच्या राजाची भव्य अशी मिरवणुक काढण्यात आली. कोरानासंबधित सर्व शासकीय नियमांचे काटेकोरपणे  पालन करीत सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खैरवाडी येथिल नदिवरील विसर्जन घाटावर आपल्या लाडक्या बाप्पाला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात निरोप दिला. यावेळी गावदेवी मित्र मंडळ, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.