शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून श्री जोगेश्वरी माता नवरात्र उत्सव साजरा करणार- उत्सव समितीचा एकमुखी निर्णय !

mahesh7

नागोठणे (महेश पवार) : येत्या काही दिवसांतच नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असून हा नवरात्र उत्सव कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोर पद्धतीने पालन करून साजरा करणार असल्याचा एकमुखी निर्णय नागोठण्याची ग्रामदैवता श्री जोगेश्वरी माता उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य यांनी घेतला आहे.

यासंदर्भात श्री जोगेश्वरी माता मंदिर विश्वस्त समितीचे सचिव भाई टके यांच्या निवासस्थानी गुरुवार दि. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी झालेल्या उत्सव समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी विश्वस्त समितीचे सचिव भाई टके, उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब टके, उपाध्यक्ष विनायक गोळे, सचिव अनिल नागोठणेकर, खजिनदार, अनंत मोरवणकर, सहसचिव किरण लाड, विश्वस्त तसेच मंदिराचे पुजारी अशोक गुरव, सदस्य पांडुरंग कोळी, मच्छिंद्र साळुंखे, राजेंद्र राउत, राजेंद्र गुरव, हनुमान बेलोसे, जगदीश चौलकर, संतोष नागोठणेकर, रविंद्र गोलिपकर, दिपक वाडेकर, दिनेश घाग, अशोक भंडारे, संजय राजीवले आदी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी विश्वस्त समितीचे सचिव भाई टके यांनी नवरात्र उत्सवात साजरा करण्यात येणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच जोगेश्वरी माता मंदिराच्या आवारात साजरा होणारा हा आपला पारंपरिक उत्सव गेल्या अनेक वर्षाप्रमाणे यावर्षीही कुठलेही गालबोट न लागता साजरा करणार असल्याची परंपरा कायम राखणार असा विश्वासही उत्सव समिती अध्यक्ष बाळासाहेब टके यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीत उत्सव समितीचे खजिनदार बबन मोरवणकर यांनी मागील वर्षाचा जमाखर्च सादर करून उपस्थित मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांच्या सह्या घेऊन आपले कर्तव्य पार पाडले. नंतर बैठकीची सांगता झाली तत्पूर्वी उस्तव कमिटीचे सचिव अनिल नागोठणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.