राष्ट्रवादी हा विकासाचा चेहरा – खा. सुनील तटकरे

sunil-tatkare

पेण (राजेश प्रधान) : सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून सर्वांचा विकास साधण्याकरिता शासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केल्याने राष्ट्रवादी पक्षाची ओळख विकासाचा खरा चेहरा म्हणून सर्वसामान्यांमध्ये झाली आहे.

तोक्ते व निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्ती काळात दरडग्रस्तांना व आपत्तीग्रस्तांना पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मदत केल्याने जनतेमध्ये राष्ट्रवादी लोकप्रिय झाली आहे व त्यामुळेच अनेक सरपंच व शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करतात असा दावा खासदार सुनील तटकरे यांनी पेण येथे राष्ट्रवादीच्या आयोजित मेळाव्यात केला.

यावेळी भाजप नेते अँड. विकास म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अनंत ढेणे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, कोप्रोलीचे सरपंच विकास पाटील, तरणखोप सरपंच अभिजित पाटील, हमरापुर सरपंच प्रदीप म्हात्रे, सोनखार सरपंच प्रतिभा पाटील, प्रभाकर लांगी, कोप्रोलीचे माजी सरपंच मनोहर म्हात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

यावेळी पुढे बोलताना खा. सुनील तटकरे म्हणाले की पेण तालुक्यातील खारेपाटातील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत, मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या गावांचा पाण्याचा प्रश्‍न सोडविणार, पेण शहराचे नियोजन करून विकासाच्या कामांना चालना देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.  हेटवणे धरणाचे पाणी सर्वप्रथम स्थानिक शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे जेएसडब्ल्यू कंपनी मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणार, बोरी शिर्की रस्त्याचे काम पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत मंजूर करून घेतले आहे.

एमएमआरडीएच्या माध्यमातून पेण तालुक्याचा विकास साधणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

पेण तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासामध्ये आपला कोणताही राजकीय हेतू नसून तटकरे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती पेण मतदार संघाची आमदार पदाची निवडणूक लढणार नाही असेही तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

पेण तालुक्यामध्ये भाजप मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावळले जाते. भाजप नेते ईतरांनी केलेल्या कामांचे श्रेय घेतात, जनसामान्यांमध्ये काम करणारे भाजपचे सर्व स्थानिक नेते भाजपला सोडून जात आहेत असे आरोप यावेळी अँड. विकास म्हात्रे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले. सामान्य नागरिकांचे कामे होत नसल्याने आपण  विकासाचा हात धरण्याकरिता राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची स्पष्टोक्ती अँड.विकास यांनी दिली.

या मेळाव्याला खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, तालुका अध्यक्ष दयानंद भगत, माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे, नगरसेवीका वसुधा पाटील, जगन म्हात्रे, विकास पाटील, शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, शहर उपाध्यक्ष विशाल बाफणा, बंडु पाटील, मंगेश नेने, हबिब खोत, वडखळ सरपंच राजेश मोकल, मळेकर सरपंच शरद पाटील, उद्योजक अनिल म्हात्रे आदींसह मान्यवर उपस्थित होते.