भोसरी जमीन घोटाळा प्रकरण : खडसेंच्या पत्नीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, अटकेची शक्यता !

court

मुंबई : पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत. मंगळवारी (दि.12) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने  एकनाथ खडसेंच्या पत्नी यांचा भोसरी जमीन घोटाळा प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. तसेच त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले. या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देता यावं यासाठी तीन आठवड्याची स्थगिती खडसेंच्यावतीने करण्यात आली. मात्र, कोर्टनं ही मागणी फेटाळून लावली.

मुंबई सत्र न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. तर एकनाथ खडसे हे सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल असून तिथं त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे त्यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. याची दखल घेत कोर्टानं या प्रकरणाची सुनावणी 21 ऑक्टोबर पर्यंत तहकूब केली.

मागील महिन्यात EDकडून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. ईडीने तब्बल एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश केला आहे. या सर्वांवर ईडीकडून मनी लॉड्रिंगचा आरोप लावला आहे.

दरम्यान, अटकेत असेले गिरीश चौधरी यांचा देखील जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता.