पोटच्या पोराने जन्मदात्या आईच्या डोक्यात दगड घालून केली हत्या !

murder4

सोलापूर : एका २१ वर्षीय तरुणाने जन्मदात्या आईची झोपलेल्या जागीच डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या  केल्याचे उघडकीस आले आहे. महत्त्वाचे म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी आईला गादीवरून ओढत नेत, घराजवळील एका झुडपात मृतदेह टाकला. नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मुलाला मुंबईला फरार झाला असून पोलिसांचे एक पथक त्याच्या मार्गावर आहे.

रुक्मिणी नागनाथ फावडे (वय-४५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर श्रीराम नागनाथ फावडे असं गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. बार्शी शहरातली वाणी प्लॉट परिसरातील शिंदे यांच्या घरी रुक्मिणी आणि श्रीराम वास्तव्यास होते. कौटुंबीक वादामुळे लहान मुलगा आणि पती हे बार्शी शहरात डंबरे गल्ली येथे राहत होते. रुक्मिणी आणि श्रीराम यांच्यात पैशावरून नेहमी वाद व्हायचा. या वादातूनच त्याने आईची हत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. श्रीरामाने यापूर्वीही आईला आणि लहान भावाला मारहाण केली होती.

या खून प्रकरणी मृत महिलेचे पती आणि लहान भावाकडे चौकशी केली असता, श्रीराम मुंबईला गेला असल्याचे समोर आले. मुंबईला जात असल्याचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आरोपीनं ठेवलं होत. हत्या केल्यानंतर घरातील सर्व कपडे घेऊन आरोपी मुंबईला पळाला. त्यानंतर तीन दिवसांनंतर हा प्रकार उघडकीस आला.