उद्या जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्यांमध्ये साजरा होणार “हात धुवा दिवस”

hand-wash

अलिबाग : आरोग्यासाठी हाताच्या स्वच्छतेचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन दि.15 ऑक्टोबर रोजी “जागतिक हात धुवा दिवस” साजरा केला जातो. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर “हात धुवा” या दिवसाचे महत्व मोठे असल्याने दि. 14 ऑक्टोबर रोजी जिल्हयातील सर्व शाळा, अंगणवाडी व माध्यमिक शाळा व ग्रामपंचायतींमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करावेत व साबणाने हात स्वच्छ धुवून निरोगी राहण्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी केले आहे.

रायगड जिल्हा परिषदेतर्फे सर्व गट विकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांना “हात धुवा दिवस” मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दि.15 ऑक्टोबर रोजी दसरा हा सण असल्याने शाळांना सुट्टी आहे. त्यामुळे जिल्हयातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच अंगणवाड्यांमध्ये दि. 14 ऑक्टोबर रोजी “हात धुवा दिवस” या कार्यक्रमाचे आयोजन करावे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्याचे महत्व सांगताना हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविणे आवश्यक असून हात धुण्याचे फायदे तोटे सांगितल्यास वर्तन बदलास मदत होणार आहे, यासाठी शालेय विद्यार्थ्यांसोबत “हात धुण्याचे महत्व व त्याचा आरोग्यास होणारा लाभ” याबाबत चर्चा व संवाद साधण्यात यावा, शालेय स्तरावर या दिवसानिमित्ताने “हाताची स्वच्छता” या विषयावर रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व पोस्टर तयार करणे, अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घ्याव्यात, घरोघरी जावून साबण गोळा करावेत.
तसेच ग्रामपंचायतीमध्येही दि.15 ऑक्टोबर रोजी “हात धुवा दिवस” साजरा करावा, सरपंच ,सर्व ग्रामंचायत सदस्य व महिला बचतगट सदस्य व ग्रामसेवक यांनीही गावपातळीवर चौकाचौकात/ सार्वजनिक ठिकाणी सामूहिकपणे “हात धुवा दिवस” प्रात्यक्षिक करावे, हे सर्व उपक्रम करोनाचे नियम पाळून करण्यात यावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी केले आहे.