एकोपा जोपासणारा जव्हारचा अंबिका चौकातील नवरात्र उत्सव

madurga
जव्हार ( जितेंद्र मोरघा ) : नवरात्रोत्सवा निमित्त सर्वत्र देवीचा जागर सुरु असुन , भारतीय संस्कृतीत नवरात्रोत्सवाला महत्वाचे स्थान असून शुध्द प्रतिपदेपासून प्रारंभ होणारा हा उत्सव विश्वव्यापक त्रिगुणात्मक आदिमायेच्या उपासनेचे महत्त्व अधोरेखीत करणारा आहे.
त्यासोबतच तो सॄजनशक्तीचे सर्वोच्च आविष्कार असलेल्या स्त्रिच्या गौरवाचा ही आहे.या निमित्ताने केला जाणारा जागर ही स्त्री शक्तीप्रती व्यक्त केली जाणारी कॄतज्ञताच आहे. त्यामुळे सर्वत्र हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो परंतु गेले दोन वर्ष कोरोना महामारीने लोकांचे जगणे मुश्किल केले आहे. नवरात्रोत्सव देखील यातून सुटलेला नाही त्यामुळे शासनाने सार्वजनिक नवरात्रोत्सवावर निर्बंध घातल्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून अतिशय साधेपणाने हा उत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे.
जव्हारच्या अंबिका चौकात अंबिका मातेचे मंदिर असून ग्रामदैवत म्हणून या मंदिरात अंबिका मातेची भक्तिभावाने पूजाअर्चा केली जाते. दररोज संध्याकाळी देवीची आरती करण्यात येत असून अष्टमीला मोठा होम या ठिकाणी केला जातो. अंबिका चौकात या नवरात्रोत्सवाला  १९७० साली सुरुवात करण्यात आली होती. आजही हा उत्सव विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे. यावर्षीही नवरात्रीचे नऊ दिवस मंडळ कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम आरोग्य विभागाच्या सहकार्याने राबवित आहे. गेल्या सात दिवसात आतापर्यंत ५०० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ देण्यात आला आहे.१००० नागरिकांना लसीकरणा चा लाभ देण्याचा मंडळाचा मनोदय असल्याचे या वर्षीचे मंडळाचे अध्यक्ष दिनेश रसाळ  यांनी सांगितले.
पूर्वी अंबिका चौकात नवरात्रोत्सवा निमित्त दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असत या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी दादा कोंडके,  शाहीर साबळे , शाहीर पांडुरंग वनमाळी , बाळ कोल्हटकर , शाहीर विठ्ठल उमप , श्री देशपांडे दादा इंदुलकर , गोविंद म्हशीलकर  , कविता शिंदे , संध्या देशमुख अशा मान्यवर कलाकारांचे कार्यक्रम तसेच भारुड ,नकला ,नाटक , मराठी व हिंदी गितांचा कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जात असत. जव्हार हे भूतपूर्व  संस्थान असून येथील दरबारी दसरा प्रसिद्ध असल्यामुळे अंबामातेच्या या नवरात्रोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शहरात या उत्सवाच्या माध्यमातून संस्थानिकांनी निर्माण केलेला वसा, संस्कृती , विविधता, एकता जोपासणारा, गावकीचा एकोपा जोपासणारा हा उत्सव आहे.
यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा केला जात आहे.