TET Exam 2021: टीईटी परीक्षेची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली, जाणून घ्या नवीन तारीख !

exam

मुंबई : राज्यात शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणारी टीईटी परीक्षा (TET Exam 2021) पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेच्या तारखांमध्ये तिसऱ्यांदा बदल करण्यात आला आहे. 30 ऑक्टोबर रोजी होणारी ही परीक्षा आता 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यात 30 ऑक्टोबर रोजी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु त्या दिवशी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

याआधी टीईटी परीक्षा 10 ऑक्टोबरला घेतली जाणार होती. मात्र, त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आल्याने ही परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु याआधीच या दिवशी आरोग्य विभागाची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे टीईटीची परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेऊन सुधारित वेळापत्र जारी करण्यात आले. मात्र, आता देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असल्याने तिसऱ्यांदा या परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी आहे.

साधारणपणे टीईटी परीक्षेला राज्यातून 3 लाख 30 हजार 642 उमेदवार बसणार आहेत. यासाठी 5 हजार परीक्षा केंद्राचे नियोजन महाराष्ट्र राज्य परिषदेने केले आहे. राज्यभरात घेतली जाणारी ही परीक्षा आता 21 नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे.

 

nca1