घरातील कचरा कालव्याच्या किनारी – आजोबांची खंत

mangav3

 

——रविंद्र कुवेसकर
उतेखोल/माणगांव
सकाळी माॅर्निंग वाॅकला जाताना माणगांवच्या विधीज्ञ अनुष्का भावे यांनी आपल्या कॅमेरात टिपलेले हे बोलके दृष्य; यात दिसणारी वयोवृध्द व्यक्ती पहाटे कालव्या किनारी इतरस्त्र पडलेला कचरा गोळा करुन त्या ठिकाणी सफाई करत होती. एवढ्या सकाळी काय करत आहात आजोबा? असा प्रश्न ऐकताच त्यांनी आपली खंत व्यक्त करीत म्हटले, लोक कचरा घरातुन आणतात आणि बेफीकीरीने कालव्या किनारी किंवा कालव्याच्या पाण्यातच फेकतात. कितीही आणि कसेही विनवणी करा पण ऐकत नाहीत. मग काय करणार? आपणच स्वच्छता करावी म्हणुन लेकी हे माझे कर्तव्य मी करतोय.
असे आत्मचिंतन करायला लावणारे उत्तर देत, तहानलेले जीव याच कालव्याचे पाणी पितात आणि आपला बळीराजा देखिल काबाडकष्ट उपसुन शेती करतो, त्याचे शेतीला हे पाणी वरदान आहे, म्हणुनच चार दाणे आपल्या मुखी लागतात. त्यांच्या साध्या सरळ भाषेतील या उत्तराने काही क्षण अवाक झालेल्या वकील अनुष्का यांनी हा प्रसंग सोशल माध्यमावर शेअर केला आहे. आपल्या सर्व माणगांवकरांनाच नाही तर लोकप्रतिनीधींसकट प्रशासकिय अधिकारी, सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारी ही छोटीसी गोष्ट, पण खुप काही शिकवण घ्यावी अशीच आहे.
आपल्या माणगांव तालुक्यात वाहणारा हा सुंदर कालवा आज त्याची ही अवस्था गटार गंगा पाहावत नाही. एक एक हाथ मिळुन जर त्या आजोबांच्या विचारांनी आपण प्रेरीत झालो तर शासनाने कालव्याचे सौंदर्यीकरन करो वा न करो! हाच कालवा माणगांवचे वैभव बनेल! लोक सकाळ संध्याकाळ इकडे मोकळाश्वास घ्यायला नित्याने फेरफटका मारतात. “साथी हात बढाना, एक अकेला थक जाये तो मिलकर बोझ उठाना” या गाण्यातील उक्ती प्रमाणे गरज आहे, ती प्रत्यक्ष कृतीची.
ज्यामुळे आपला गाव आपले शहर स्वच्छ सुंदर होईल. अन्यथा जे भयावह चित्र चालु आहे ते आणखी बिकट भयंकर होऊन आपली पुढची पिढी आपलाच कित्ता गिरवणार दोष देणार, असे चित्र ऐरणीवर आले आहे. अशा प्रकारची भावना या निमीत्ताने पाहावयास मिळत आहे. काळनदीचेही चित्र फारसे चांगले नाही. प्रदुषण विरहित स्वच्छता व उत्तम आरोग्य सर्वांनाच हवयं, पण ते आप आपल्या घरापुर्तच मर्यादित विचारांच्या चौकटी प्रमाणे हवय. सार्वजनिक ठिकाण ही सरकारची जबाबदारी? म्हणुनच ही चौकट भेदणारे आजोबांचे स्वच्छताग्राही हे चित्र फारच बोलके आहे.