तरुणांनो निसर्गाशी छेडछाड नको…

gudhekar-shantaram
पावसाळा सुरू झाला की धबधब्याचे ठिकाण, नदी, एखादा किल्ला किंवा निसर्गरम्य ठिकाणी जायचे बेत नक्की होतात. अशा ठिकाणी अनेकदा अतिउत्साहाच्या भरात एखादी दुर्घटना घडते. निसर्गाच्या सहवासात जाताना त्याच्या नियमांप्रमाणेच वागायचे हे लक्षात घ्यायला हवे. कारण मजा, मस्ती यासोबतच तुम्हाला स्वत:ची काळजी घेणं देखील आवश्यक आहे. अनेकदा पर्यटक धबधबा, गड-किल्ले येथे भटकंती करायला जातात. पण चुकीचे पाऊल उचळल्यामुळे आपला जीव देखील गमावतात. कधी दारूच्या नशेत तर कधी सेल्फीच्या नादात, तर कधी एकादे धाडस दाखवण्याच्या वेडापायी अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पर्यटकांनी हे समजणे गरजेचे आहे की, ट्रेकिंग म्हणजे फक्त स्वानंद नाही. तर यात अनेक जणांचा सहभाग असल्यामुळे तिथे वर्तनाचे, सुरक्षेचे सामाजिक भानही ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे ट्रेकिंगला जाताना एखाद्या अनुभवी ट्रेकिंग ग्रृपसोबत जाणे योग्य ठरेल. हल्ली अनेक अनुभवी ट्रेकिंग ग्रुप छोटे-मोठे ट्रेक आयोजित करत असतात.त्याचा फायदा घ्यायला हवा.
महत्त्वाचे म्हणजे निसर्गरम्य स्थळी जेव्हा आपण जातो तेव्हा काळजी घेणे आवश्यक आहे. एखाद्या अनुभवी ग्रुपसोबत जाताना तुमच्यावर त्या ग्रुप लिडरचे बारीक लक्ष असते. पण नवखे तरूण जेव्हा अशा ठिकाणी जातात तेव्हा ते सुरक्षेच्या दृष्टीने अजिबात विचार करत नाहीत. शिवाय अशा ठिकाणी जायचे म्हणजे तुमची मानसिक आणि शारिरीक तयारी लागते.
पावसाळी सहलीला निघण्यापूर्वी हे जाणून घ्यायला हवे की आपण कोणाबरोबर चाललोय. आपण ज्यांच्याबरोबर जातोय तो ग्रुप किंवा ती व्यक्ती पूर्वी कधी तिथे जाऊन आली आहे का? नसेल तर आधी जाऊन आलेल्या व्यक्तींकडून त्या ठिकाणाची थोडी माहिती गोळा करायला हवी. ट्रेकिंगला ज्या ठिकाणी जात आहात तो किती दूर आहे? किंवा पायी त्या ठिकाणी पोहचण्यास किती वेळ लागतो? तेथे कसे जायचे? ट्रेकिंग पॉईंटपासून एकादे गाव किंवा पाडा किती अंतरावर आहे? तेथे वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे का?  जर असेल तर तिथला दूरध्वनी क्रमांक काय?  गावातील सरपंचाचा फोन नंबर काय? याची माहिती गोळा आवश्यक आहे. ट्रेकला निघण्यापूर्वी सर्व गोष्टींची एक चेकलिस्ट तयार करा. अमुक एका प्रवासाला जाण्यासाठी तुमच्या बॅकबॅगमध्ये नेमक्या किती आणि कोणत्या गोष्टींची गरज आहे, याची यादी बनवा आणि त्यानुसार आवश्यक वस्तू बॅगेत न विसरता भरा. उघड्याने किंवा बनियान, हाफपँट घालू नये.
कारण पाऊलवाटेवरील वनस्पतीशी संपर्क आल्यास किंवा जंगली किडे चावल्यावर अॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंगावर फुल टीशर्ट आणि फुलपँट असावी. पायात रबर सोल असलेले बूट असायला हवेत. हातात एक छोटी चार फुटांपर्यंत काठी ठेवा. एखादा साप जाताना दिसला तर त्याला काठीने मारू नका किंवा हाताने स्पर्श न करता काठीच्या मदतीने त्याला वाटेतून दूर करणे सोपे होईल. साप स्वत:हून जात असेल तर जाऊ द्या. उगाच धाडस दाखवू नका. प्रथमोपचाराची बॅग जवळच ठेवा. त्यात आधार फळी आणि त्रिकोणी बँडेज जरूर ठेवा. फ्रॅक्चर झालेल्या व्यक्तीस बांधण्यास उपयोगी पडते. मांजरपाट कापडाचा दोन फुटाचा चौकोन घेऊन मधून तिरपा काप द्या. दोन त्रिकोणी बँडेज तयार होतील.ते दुखापत झालेल्या व्यक्तीसाठी कामी येईल. धबधब्याच्या ठिकाणी जेथे थेट वरून पाणी पडत असेल त्या ठिकाणापासून थोडे अंतर ठेवूनच बसावे. धबधबा कोसळणाऱ्या ठिकाणी सतत पडणाऱ्या पाण्यामुळे कुंड तयार होते. त्याची खोली तुमच्या जवळील काठीनं, बांबूनं किंवा दोराला दगड बांधून मोजावी.
धो धो पाणी पडत असलेल्या ठिकाणी खाली बसू नका. कारण डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्यातून धबधब्यात तयार होतो. त्या वाहणाऱ्या पाण्यातून एखादं झाड किंवा फांदी पाण्यातून वाहात येणारा दगड उंचावरून तुमच्या डोक्यात कोसळण्याची शक्यता आहे.
साप चावल्याची घटना घडली तर चावलेल्या जागेवरचे दाताचे व्रण पाहा. दाताचे व्रण सरळ रेषेत गोलाकार असतील तर बिनविषारी आणि दोनच दातांचे व्रण असतील तर साप विषारी असा अंदाज करता येतो. त्या व्यक्तीस लवकरात लवकर हॉस्पीटलमध्ये पोहोचवणे अवश्यक आहे. लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी. पोहता येत नसेल तर गुडघ्यापर्यंत पाणी असलेल्या खोलीपर्यंतच जावे. कारण पाण्याची भिती वाटत असेल तर पटकन बाहेर पडता येईल. कंबरेपर्यंत पाण्यात जाऊ नका. पाण्याचा प्रवाह जोरदार असेल तर पाणी तुम्हाला खेचून नेईल.डोंगरावर असताना काळे ढग आले तर जास्तीत जास्त वेळ पाण्यात राहू नका. कारण डोंगरातील वरच्या भागात पाऊस पडला तर खालील भागात कुंडात किंवा नदीत पाण्याची पातळी आणि प्रवाह पटकन वाढू शकतो. सर्वात महत्त्वाचं निसर्गरम्य स्थळी कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका.
दारू पिणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. असे अनेक अपघात झाल्याचं आपण बातम्यांमध्ये पाहतोच. मुळात निसर्गरम्य वातावरणात दारू पिणं हे चुकीचं आहे. अनेकदा पर्यटक अशा ठिकाणी मद्यपान करून काचेच्या बाटल्या तिकडेच फेकून जातात. या काचांमुळे पर्यटकांना, गावकऱ्यांना आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना इजा होऊ शकते.शासनाकडून किंवा स्थानिक नगरपंचायत,ग्रामपंचायत किंवा पोलीस,व्यवस्थापक मंडळांतर्फे लावलेल्या सुचना याचे पालन करावे. धबधब्याखाली /समुद्र किनारी /उंच डोंगराळ भाग येथे ब-याच दुर्दैवी घटना घडतात.
या घटना कोणाच्या चुकीमुळे घडतात. याचा तरुण-तरुणी यांनी अभ्यास करुन काही तरी धडा घ्यायला हवा. तरी आम्ही कृपया तरुणाईला आव्हान करतो की आपण निसर्गाचे आस्वाद घ्या….मनमुराद आनंद लुटा.. निसर्गाचे आनंद उपभोगा. पण….कृपया निसर्गाशी छेडछाड करु नका. कृपया आपण निसर्गावर मात करु नका. आपले आयुष्य खूप सुंदर असून आपल्या घरी आपले कुटुंब वाट पाहत असते. याचे विसर पडु देऊ नका…….!!!
—शांताराम ल. गुडेकर
पार्क साईट, विक्रोळी (प.)