मुंबई -गोवा महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा ! यावर्षीदेखिल कोकणवासियांचा खड्यातुनच होणार प्रवास

road-goa1
सुकेळी (दिनेश ठमके) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. तरी अद्यापही मुंबई -गोवा महामार्गावरील खड्डयांचे विघ्न काही केल्या दुर झालेले नाही. कारण मुंबई -गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवापुर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचा सरकारकडुन गाजावाजा करण्यात आला आहे.
परंतु सद्याची महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था पाहता गणपतीसाठी गावाला जाणा-या कोकणवासीयांना यावर्षीचा प्रवास देखिल हा खड्डयांतुनच करावा लागणार आहे. त्यातच वाहतुक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामार्गावरील या भयाणक खड्ड्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे मृत्युचे सापळे ठरत आहेत.
गणेशोत्सवासाठी गावाला जाणा-या चाकरमान्यांना पेण ते इंदापूर या दरम्यानच्या खड्डयांमधुन प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. वडखल, नागोठणे, सुकेळी, कोलाड ते अगदि इंदापूर पर्यंत खड्डयांमधुन कसरतीचा प्रवास दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये कोकणवासीयांचा चुकलेला नाही.
महामार्ग फक्त म्हणण्यापुरताच! पण येथिल खड्डयांचा प्रवास काही संपता संपत नाही. १ ते ४ फुटांचे खड्डे सध्या महामार्गावर पडलेले आहेत. सध्या महामार्गावर प्रवास करतांना  येणारा पुढचा खड्डा हा किती मोठा असेल याची भिती वाहनचालकांच्या मनाला वाटते. त्यामुळे इंदापुर ते मुंबई या ३ तासांच्या प्रवासाला ५ ते ६ तास लागत आहेत. तर दुसरीकडे दुचाकीवरुन मुंबई -गोवा महामार्गावर प्रवास करणे म्हणजे दिव्यच. कारण कुठे खड्डा घात करेल याचा नेम नाही. त्यामुळे मुंबई -गोवा महामार्गावरील खड्डे दुचाकीस्वारांसाठी मृत्युचे सापळे बनले आहेत.