कोलाड पाटबंधारे विभागाकडून शेतकरी, ग्रामस्थांचा विश्वासघात

canal
कोलाड (श्याम लोखंडे) : कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी किल्ला ते निवी पर्यंतच्या विभागीय कालव्याला तब्बल आठदहा वर्षापासून पाणी नाही. पूर्वी सुजलाम सुफलाम असलेल्या विभाग कालव्याला पाणी सोडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी अपेक्षीत प्रयत्न केले नाहीत. कालव्याचे काम करण्यासाठी एकदोन वर्षे द्या, नंतर पूर्वपार कालव्याला पाणी सोडू असे म्हणणाऱ्या कोलाड पाटबंधारे विभागाने शेतकरी, ग्रामस्थांचा विश्वासघात केला.
कालव्याला पाणी नसल्याने ऐन उन्हाळ्यात वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, निवी हद्दीत अक्षरश: वाळवंटाचे रूपडे येते. विहीरी, बोअरवेल सुकाड होतात. कालव्याला पाणी नसल्याने भातशेती इतिहास जमा झाली. स्वच्छता, गुरेढोरांसाठीचा पाणी प्रश्न गंभीर बनला. त्यामुळे कालव्याला पाणी सोडा अशी मागणी ग्रामस्थांची दरवर्षी राहिली. मात्र बडे लोकप्रतिनिधी व प्रशासन अधिकाऱ्यांना आजवर दया आली नाही, हे वास्तव असतानाच विभागीय ग्रामस्थांनी अखेर पुन्हा एकदा सप्टेंबर मध्यान्ह पाण्यासाठी बंड पुकारले, ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात राहिले, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले.
याच घडामोडीत पाटबंधारे प्रशासन वरमले. डिसेंबर जानेवारी प्रारंभी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र डिसेंबर अखेर पाणी सोडण्याच्या दृष्टीने अजूनपर्यंत कालव्याची साफसफाई, दुरुस्तीला प्रारंभ केले नसल्याने विभागीय ग्रामस्थ, समन्वय समितीने स्पष्ट नाराजी व्यक्त केली. पाटबंधारेला दुरुस्तीसाठी अजून मुहूर्त सापडेना ? असेच चित्र दिसत आहे. दरम्यान, कालवा साफसफाई व दुरुस्तीसाठी तांत्रिक विभाग ॲक्शन मोडवर आहे, अशी ओघम उत्तरे संबधीत अधिकाऱ्यांनी दिल्याने कालव्याच्या पाण्यासाठी आंदोलनाच्या भूमिकेत सज्ज रहा, असे आवाहन पुन्हा बुधवारी कालवा समन्वय समितीने केले आहे, त्यामुळे पाटबंधारे प्रशासन पुन्हा नव्याने काय स्पष्टीकरण करतो ? याकडे संबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कालव्याचे पाणी पाटबंधारे विभागाने दुरुस्तीच्या नावाखाली बंद केले. नको तिथे मोऱ्या, काँक्रिटीकरण कामावर करोडो रुपये निधीची उधळपट्टी केली. कामे अर्धवट, निकृष्ट करून करोडोंचा गैरव्यवहार झालेला आहे. त्यासंबधी तक्रारी व चौकशीची मागणी कायम आहे. कालवा दुरुस्तीसाठी पाणी तुम्ही बंद केलेत, आता पाणी तुम्हीच सोडा, अशी आग्रही मागणी अनेक वर्षापासून ग्रामस्थांची आहे. मात्र कालव्याच्या पाण्याकडे आमदार, खासदारांनी कधीच सवेंदनशील लक्ष दिले नाही, पाण्यासाठीची आग्रही मागणी नेहमीच कमजोर ठरली. अखेर यावर्षी आम्ही कालव्याला पाणी घेतल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा विभागातील ग्रामस्थांनी घेतला.
त्या भूमिकेला आंबेवाडी, संभे, पाले, किल्ला ग्रामस्थांनीही मोठे पाठबळ दिले. पाण्यासाठी अल्टिमेटम देत ग्रामस्थ आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यातच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांनी डिसेंबरला पाणी सोडण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला. त्यानंतर पाटबंधारे प्रशासन वरमले. रोहा तहसील कार्यालयात महत्वाची बैठक झाली. बैठकीला रायगड पाटबंधारेच्या कार्य. अभियंता दीपेश्री राजभोज, तहसीलदार कविता जाधव, समन्वय समितीचे विठ्ठल मोरे, राजेंद्र जाधव, तुकाराम भगत, राकेश बामगुडे, संदेश मोरे, किशोर कळंबे, मारुती फाटक, ज्ञानेश्वर दळवी व ग्रामस्थउपस्थित होते. बैठकीत उपोषण मागे घ्यावे, डिसेंबर अखेर कालव्याला पाणी सोडले जाईल असे लेखी आश्वासन प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्य. अभियंता दीपेश्री राजभोज यांनी दिले. त्यानंतर आमरण उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले. कालवा प्रचंड डॅमेज आहे. दुरुस्तीची कामे मोठे आहे, प्रशासनाला समजून घेतले जाईल, याच ग्रामस्थांच्या भूमिकेत किमान आजमितीस कालव्याचे कोणतेच काम सुरू नाही, साफसफाई दुरुस्तीला मुहूर्त कधी सापडणार ? असा सवाल उपस्थित झाला आहे.
कोलाड पाटबंधारेच्या कालव्यासंबधी अनेक मुद्दे उपस्थित झाले. आमच्या हक्काच्या धरणाचे पाणी तालुका बाहेरील कंपन्यांना विकून करोडोंचा महसूल प्रशासन घेत आहे. पण ज्यांच्यासाठी कालवा प्रकल्प आले, त्याच शेतकऱ्यांना आठदहा वर्षे पाणी नाही. यावर्षी कालव्याला पाणी आम्ही घेणारच असा लढा कालवा समन्वय समितीने सुरू केला. त्यानंतर पाणी सोडले जाईल अशा प्रशासनाच्या लेखी आश्वासनावर आंदोलन तूर्तास स्थगित केले. मात्र आज नोव्हेंबर अखेर कालव्याचे कोणतेच काम सुरू नाही. याबाबत संबंधीत कालव्याचे काम कुठपर्यंत आले, अशी विचारणा केली असता तांत्रिक विभाग ॲक्शन मोडवर आहे असे सांगत कालवा साफसफाई दुरुस्तीसाठी लवकरच यंत्रणा सज्ज होईल अशी टोलवाटोलवी अभियंता गोरेगावकर नेहमीच करत आलेत,
दुरुस्ती व साफसफाई कधी होणार ? हे ठामपणे सांगण्यात येत नाही. दुरुस्तीकडे पाटबंधारेच्या मुख्य कार्य. अधिकारी दीपश्री राजभोज यांच्याकडूनही ठोसपणे स्पष्टीकरण मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांत नाराजीची भावना आहे. अशात प्रशासनाने कालव्याला पाणी सोडण्याबाबत लेखी आश्वासन दिले आहे. कालव्याला पाणी सोडले जाईल, असा विश्वास व्यक्त करत काही दिवसात कालव्याची दुरुस्ती व साफसफाई प्रारंभ न दिसल्यास स्थगित आंदोलन नव्या दमाने उग्र करू असा इशारा समितीचे विठ्ठल मोरे, तुकाराम भगत यांनी पुन्हा दिला. त्यावर आता पाटबंधारे प्रशासन नेमके काय स्पष्टीकरण करतो, कालवा दुरुस्ती व साफसफाई कधी सुरू होते ? यावर कालव्याच्या पाणी संदर्भात पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांसमवेत पुन्हा लवकरच बैठक घेऊ अशी प्रतिक्रिया तहसीलदार कविता जाधव यांनी दिल्याने कालव्याचे पाणी पेटते की थंडावते ? हे लवकरच समोर येणार आहे.