ओम साई पदयात्रा मित्र मंडळाच्या शिर्डी पायी दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

pen-dindi1
पेण (राजेश प्रधान) : पेण येथील ओम साई पदयात्रा मित्र मंडळातर्फे आयोजित पेण शिर्डी पायी पदयात्रा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पेण तालुक्यातील साई भक्तांनी या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने भाग घेतला आहे. सदर दिंडी साईची पालखी घेऊन पेण ते शिर्डी पायी प्रवास करणार आहे. मंडळाचे यंदाचे हे 14 वे वर्ष आहे.
pen-dindi2
पेण शहरात साईंची भव्य मिरवणूक व साईबाबाचें चलचित्र देखावा प्रसिद्ध वरळी बिट्स बेंजो पथकासमवेत काढण्यात आली. या मिरवणूकीत शहरासह तालुक्यातील साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डोळ्यांचे पारणे फेडणारी अशी ही मिरवणूक पेण शहरात काढण्यात आली. यावेळी महाप्रसादाचा लाभ साई भक्तांनी घेतला.
pen-dindi-3
पेण शहरातील प्रसिद्ध साईमंदिरात बाबांची आरती करुन दिंडी पेण-खोपोली रस्त्यावरुन शिर्डीच्या दिशेने रवाना झाली. लोणावळा घाट, कामशेत, तळेगाव, चाकण, मंचर, आळेफाटा मार्गे ही पायी पदयाञा सोमवार दि. 28  नोव्हेंबर रोजी शिर्डी नगरीत दाखल होईल. त्यानंतर साईबाबाचें दर्शन घेतल्यानंतर सर्व पायी पदयाञी सदस्य पुन्हा पेणकडे परतीच्या प्रवासाला निघतील अशी माहिती मंडळाच्यावतीने देण्यात आली. यावेळी ओम साई पदयात्री मंडळाचे सदस्यांसह अनेक पदयात्री तसेच शहरासह तालुक्यातील भक्त उपस्थित होते.
pen-dindi
दरम्यान गुरुवार दि. 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 7  वाजता पेणमधील सेंच्युरियन पार्क, चिंचपाडा येथे साईंचा भंडारा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व साईभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.