सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “इमॅजिनेशन”

sahjach

“स्वतः ची गाडी असताना हा तिच्याबरोबर का गेला??? मला म्हणाला महत्वाची मीटिंग आहे.. ही कोणती मीटिंग करायला चाललाय! आणि त्या रोहिणी बरोबर कोणती मीटिंग?? ह्यांचं ऑफिस वेगळं.. ह्यांचं काम वेगळं… मग हे एकत्र का गेले??? ह्यांचं काही चालु तर नाही ना??? माझा नवरा मला फसवत तर नाही ना???”
रोहिणी आणि प्रतीकला एकत्र एका गाडीने जाताना बघून प्रियाच्या मनात नको नको ते विचार सुरु झाले..
दुपारी प्रियाने प्रतीकला फोन केला.. प्रतिकने फोन उचलला नाही. प्रियाच्या मनात परत चक्र सुरु झालं.
“हा नक्की मीटिंग मध्ये आहे.. की अजुनही त्या रोहिणी सोबत आहे?? दोघं कामाच्या नावाने एकत्र फिरायला तर नाही ना गेले?? अशा कोणत्या अवस्थेत आहे प्रतीक.. की माझा फोन नाही उचलु शकत??”

प्रतीकला फक्त रोहिणीच्या गाडीत जाताना बघून प्रिया नको नको ते इमॅजिन करायला लागली होती. त्या विचारांत तिने दिवसभर कोणतंही काम केलं नाही.. जेवण केलं नाही.. घर अवरलं नाही.. फक्त नको नको ते इमॅजिन करत राहीली.

संध्याकाळी प्रतीक घरी आला. आल्यावर तिला त्याच्याशी बोलायची ईच्छा सुद्धा झाली नाही. पण प्रतीक नॉर्मल होता. तो आला.. त्याने शूज काढले.. आणि शूज काढता काढता रोजच्या सारखं प्रियाशी बोलायला सुरुवात केली.

“अगं तुला माहिती आहे का?? सकाळी आपली गाडी पंक्चर झाली होती. आणि मला मीटिंगला जायला उशीर झाला होता. मग आपल्या बिल्डिंग मधली ती आहे ना.. रोहिणी साठे.. ती तिकडेच जात होती. मला तिने लिफ्ट दिली. आणि म्हणून मी मीटिंगवर वेळेत पोहचु शकलो. दिवसभर फोन बघायला पण वेळ नाही मिळाला. चल, मी आंघोळ करून घेतो. खुप दमलोय. “

असं म्हणून प्रतीक आंघोळीला निघुन गेला. आणि त्याचं बोलणं ऐकून प्रियाला स्वतः च्या इमॅजिनेशनची लाज वाटली. ‘आपला नवरा आपल्याशी एवढा प्रामाणिक असताना आपण असं घाणेरडं इमॅजिन करत पूर्ण दिवस वाया घालवला..!’

कित्येकदा आपणही कोणत्या तरी बाबतीत असं निगेटिव इमॅजिन करत राहतो.. आणि आपला मुड तर खराब करून घेतोच.. पण विचारा विचारांत आपण एखाद्या व्यक्तीलाही दुसऱ्या नजरेने बघायला लागतो. एखाद्या व्यक्तिबद्दल, वस्तु बद्दल किंवा एखाद्या घटने बद्दल पूर्ण माहिती नसताना आपण चुकीचे विचार करून मोकळे होतो. आणि नंतर पश्चाताप करायची वेळ येते.
त्यामुळे शक्यतो अर्धवट माहितीवर चुकीचे विचार किंवा इमॅजिनेशन करणंही तेवढंच चुकिचं आहे.
त्यामुळे शक्यतो एखाद्या बाबतीत शंका आली, तर तिचं निरसन करावं.. माहिती अर्धवट असेल..तर पूर्ण माहिती मिळवावी. आणि मगच पुढचा विचार करावा.

-©के. एस. अनु