सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “खोटं”

“तुला कळतंय का.. मला खुप त्रास होतोय तुझ्या अशा वागण्याचा..!”
सीमा वरदवर ओरडुन म्हणाली.

वरद अगदी शांतपणे सीमाला समजवायचा प्रयत्न करत बोलु लागला..
“शांत हो सीमा.. माझ्या वागण्यानी तुला आत्ता त्रास होईल.. पण भविष्यात आपलं नातं चांगलं राहील..”

“भविष्यात??? अरे आत्ताचा क्षण तर खराब केलास ना??? मग पुढचा कसला विचार करतोस??”

“अगं, मी काय आत्ता सोडून गेलोय का तुला?? मी उद्या जाणार आहे.. आज मी तुझ्या सोबतच आहे ना… “

“पण उद्या जाणारच ना!!! माझी ईच्छा नसताना ही!”

“सीमा.. अगं उद्या जर मला ऑफिसचं काम आलं असतं.. तर जावं लागलं असतंच ना?? तेव्हा सोडलं असतंच ना???”

“ऑफिसचं काम वेगळं.. आणि मित्रांसोबत मॅच बघायला जाणं वेगळं..!”

“मग मी तुझ्याशी खोटं बोलायला हवं होतं का??? ऑफिसच्या नावाने मॅच बघायला जायला हवं होतं का???”

“म्हणजे मॅच साठी तू माझ्याशी खोटं बोलणार??”

“एक्साक्टली!!! हेच मला म्हणायचंय … मी खोटं बोलून गेलो असतो.. आणि नंतर तुला समजलं असतं.. तर तो विश्वासघात झाला असता..! पण मी तुझ्याशी खरं बोलायचा निर्णय घेतला. माझ्या निर्णयाने तुला थोडा वेळ वाईट वाटेल.. पण तुझा माझ्यावर राग राहणार नाही… मी तुला धोका दिल्याची.. फसवल्याची भावना राहणार नाही.. तुला हा विश्वास राहील.. की तुझा नवरा तुझ्याशी प्रामाणिक आहे. समजतंय ना तुला मी काय म्हणतोय..?”

वरदचं बोलणं ऐकून सीमा विचारांत पडली. त्याच्या बोलण्यात तथ्य आहे.. हे तिला जाणवलं.

आपल्या जवळच्या व्यक्तींना नेहमी विश्वासात घेऊन खरं काय ते सांगावं. खरं बोलून एक वेळ थोडं दुःख होईल.. वाईट वाटेल.. पण विश्वास राहील. आणि राग थोड्या वेळाने निघुन ही जाईल. तो एक क्षण त्रासाचा असेल.. पण पुढे सुख असेल.

या उलट, खोटं बोलल्याने विश्वास कायमचा उडुन जाईल. मग त्यापुढे किती ही वेळा खरं बोललो तरी कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि माणसं ही दुरावतील. एक क्षण संभाळण्यासाठी खोटं बोललो तर ते एक खोटं लपवायला हजार वेळा खोटं बोलावं लागेल. आणि आयुष्यच बदलून जाईल..
त्यापेक्षा योग्य त्या क्षणी खरं बोलणं उत्तम.

-©के. एस. अनु