पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’चा अभिमान असलेला सिंहगड किल्ला यंदा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस शिवरायांच्या सानिध्यात’ या मोहिमेने जागरूकतेचा केंद्रबिंदू ठरला. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा वारसा जपण्यासाठी आणि गड-दुर्गांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने 24 नोव्हेंबर रोजी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
मोहिमेची सुरुवात आदिशक्ती भवानी मातेच्या चरणी आणि श्री कोंढाणेश्वर व श्री अमृतेश्वर यांच्या चरणी सामूहिक प्रार्थनेने झाली. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून उपस्थित धर्मप्रेमींना श्रीकांत बोराटे आणि दिपक आगावणे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सर्व धर्मप्रेमींनी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ नामजप करून रामराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.
प्रमुख कार्यक्रम :
इतिहास आणि प्रेरणा : तानाजी कडा, बुलंद दरवाजा, तानाजी मालुसरे समाधी, कोंढाणेश्वर मंदिर यांसारख्या ऐतिहासिक स्थळांची माहिती देत, शिवराय व मावळ्यांच्या अध्यात्मिक बळावर आधारलेल्या धर्मकार्याचा अभ्यास करण्यात आला.
स्वसंरक्षण प्रात्यक्षिके: मोहिमेच्या अंतिम टप्प्यात सर्व धर्मवीरांनी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. ज्याप्रमाणे गडावर मावळ्यांना प्रशिक्षण दिले जायचे त्याच प्रकारचे प्रशिक्षण आज आपल्याला या काळात मिळत आहे असे सर्वांनी अनुभवले.
पुणे जिल्ह्यातील भोर, वाघळवाडी, नवलेवडी, तळेगाव व इतर भागांतून 170 पेक्षा अधिक धर्मप्रेमींनी मोहिमेत सहभाग घेतला. गडावरील पर्यटक आणि व्यवसायिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
गडकोट संवर्धन आणि राष्ट्रधर्म रक्षणासाठी समाजाने एकत्र येऊन प्रेरणा घेण्याचा निर्धार या मोहिमेद्वारे दृढ करण्यात आला.