पनवेल (संजय कदम) : पनवेलसह नवी मुंबई परीसरात एटीएम मध्ये जाणा-या नागरीकांना बोलण्यात गुंतवून ठेवुन त्यांचे एटीएमच अदलाबदली करून नागरीकांची रक्कम पळवून फसवणुक करण्याबाबतचे तकारीचे प्रमाण वाढले होते. या संदर्भात तळोजा पोलिसांनी या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतल्याने त्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस आले आहेत.
एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्त नवी मुंबई विपिन कुमार सिंह. सह पोलीस आयुक्ता डॉ. जय जाधव, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- २ पंकज डहाणे, सहा पोलीस आयुक् पनवेल विभाग भागवत सोनवणे यांनी वेळोवेळी बैठक घेऊन अशाप्रकारचे गुन्हेगारांवर लक्ष केंदीत करून त्यांचेविरुद्ध कडक कारवाई करण्याकामी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तळोज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक, जितेंद्र सोनवणे व गुन्हे प्रकटीकरण शाखा तळोजा पोलीस ठाणे यांना सदर गुन्हयांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना व दाखल गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास करणेबाबत वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन केले होते.
तळोजा पोलीस ठाणे येथे सन २०२२ मध्ये एटीएम कार्डची अदलाबदली केलेबाबत एकुण ३ गुन्हे दाखल असून सदर गुन्हयांच्या तपासादरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात घडलेल्या गुन्हयांचा तपशिल संकलीत करून घटनास्थळांवरील सशयीतांचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून गुन्हे करताना वापरलेल्या वाहनाचे प्रकार, गुन्ह्यांचे ठिकाण, वेळ व वार, आरोपीतांचे वर्णन यांचे तपशिलवार वर्गीकरण करून अभ्यासपूर्ण व कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती प्राप्त केली. एटीएम कार्ड बदली करून फसवणुक करणा-या सराईत गुन्हेगार यांचा कसोशीने मार्ग काढत असताना मिळालेल्या गोपनिय बातमीच्याआधारे ०३ डिसेंबर २०२२ रोजी तळोजा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा करण्याच्या तयारीत बाहेर पडलेल्या एका ऑटो रिक्षाचा पाठलाग करून त्यांना थांबवुन त्यामध्ये बसलेल्या ०३ संशयीत इसतमांना ताब्यात घेतले. संशयितांचे चौकशीदरम्यान त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय वाढला.
आरोपीची कसून तपासणी केली असता आरोपी गणेश लोंडते (वय २४ उल्हासनगर), अजय यादव (वय २५ उल्हासनगर) व विकी पिल्ले (वय २८ अंबरनाथ) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून वेगवेगळया बँकांचे ९७ एटीएम कार्ड मिळुन आले तसेच त्यांनी अलिकडील काळात एटीएम बदली करून फसवणुक गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना तळोजा पोलीस ठाणे, भादवि कलम ४२०, ४०६,३४ या गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे. आरोपींना अटक करताना आरोपींच्या अंग झडतीमध्ये वेगवेगळ्या बँकांचे ९७ एटीएम कार्ड्स मिळून आल्याने आरोपींची पोलीस कोठडी रिमांड घेवुन चौकशी केली असता त्यांनी या पुर्वी नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे रत्नागिरी व लातुर हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
आरोपींतांनी वेळोवेळी गुन्हे करण्याकरता ०१ रिक्षा वापरली असुन तळोजा पोलीसांनी ही रिक्षा हस्तगत केली आहे. तसेच आरोपीनी चोरी केलेले ९७ एटीएम काईस, मोबाईल फोन व १२,०००/- रोख रक्कम असा सुमारे १ लाख २२ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून तळोजा पोलीस ठाणे कडील ०३ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सदर कामगिरी वपोनि जितेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्तात्रय किद्रे, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, पोहवा दिपक पाटील, पोहवा विजय पाटील, पोहवा गुरुनाथ मुंडेरे, पोना हरिदास करडे व पोशि संदेश उतेकर यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास तळोजा पोलीस ठाणेमार्फत चालु आहे.