ठाणे : ठाणे महापालिकेने शहरातील मॉलमध्ये येणा-या ग्राहकांसह परराज्यांतून येणा-या मजुरांसाठी ठाणे रेल्वेस्थानकात मोफत अॅण्टीजेन चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. चार पथके या चाचण्या करीत आहेत. महापालिकेने गुरुवारी एका दिवसात तब्बल ५,०५२ इतक्या चाचण्या केल्या.
राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सातत्याने चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर महापौर नरेश गणपत म्हस्केही याचा पाठपुरावा करीत आहेत. त्यानुसार, आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरात प्रभाग समितीनिहाय मोफत अॅण्टीजेन चाचणी केंद्रे सुरू केली आहेत.
सुरुवातीला महानगरपालिका क्षेत्रात तीन हजारांपेक्षा जास्त आणि त्यानंतर रोज चार हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट होते. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये महापालिका तसेच खासगी प्राधिकृत प्रयोगशाळांच्या माध्यमातून चार हजारांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने साध्य केले आहे. तसेच दुस-या बाजूला रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यातही प्रशासनाने यश मिळविले आहे.