नवी मुंबई : कोरोना संकटाकडे संधी म्हणून पाहणार्या नवी मुंबईतील काही हॉस्पीटल्स विरूद्ध जनमानसामध्ये संताप वाढत चालला आहे. ही रूग्णालये रूग्णांकडून लाखो रूपये उकळत आहेत. शिवाय 30 हजार रूपयांपासून 1 लाखापर्यंत अनामत रक्कम मागत आहेत. या जनक्षोभाची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. मनसेच्या पदाधिकार्यांनी आयुक्तांची भेट घेऊन कारवाई करा, अन्यथा असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा दिला आहे.
नवी मुंबईमध्ये खासगी रुग्णालयामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी 30 हजारांपासून 1 लाख रुपये अनामत रक्कम मागत आहेत. रोज रुग्णांकडून पीपीई किटसाठी पैसे घेतले जात आहेत. कोविड व इतर आजारांसाठीही 2 ते 10 लाख रुपयांपर्यंत बिल आकारणी करत आहेत.
याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तत्काळ मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. शहर प्रमुख गजानन काळे यांनी रुग्णालयांकडून होणारी लूट थांबवावी, अशी मागणी केली. नागरिकांकडून वसूल केलेल जादाचे पैसे त्यांना परत देण्यात यावेत. रुग्णालयांना फक्त नोटीस नको, प्रत्यक्षात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. पालिकेने कारवाई केली नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
यावेळी काळे यांच्यासह सविनय म्हात्रे, नीलेश बाणखेले, विनोद पार्टेख, सचिन कदम, विलास घोणे, रूपेश कदम, सचिन आचरे, आप्पासाहेब कोठुळे, नितीन खानविलकर, सागर नाईकरे, सनप्रीत तुर्मेकर यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते. शिवसेना,भाजप, काँगे्रससह इतर सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीही पालिकेकडे यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला आहे