पुणे : भारतीय औषध महानियंत्रकाने (डीसीजीआय) कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीला परवानगी दिली होती. यानंतर भारत बायोटेक, पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही), इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या तीन संस्थाच्या देखरेखीत 12 सेंटरवर मानवी चाचणी जवळपास पूर्ण झाली आहे.
कोविड प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा डोस राज्यासह देशभरातील 375 व्यक्तींना देण्यात आला. या सर्वांची प्रकृती चांगली आहे. शिवाय त्यांच्यात कुठलेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. या व्यक्ती सध्या देखरेखीखाली आहेत.
देशात कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांचा आकडा दररोज नवीन रेकॉर्ड बनवत आहे. शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 26 लाखांच्या जवळ पोहचली. मागील 24 तासात कोरोनाची 63 हजार 490 नवी प्रकरणे समोर आली, तर 944 लोकांचा मृत्यू झाला आहे. नव्या केस आल्यानंतर देशात एकुण रूग्णांची संख्या 25 लाख 89 हजार 682 झाली आहे. शुक्रवारी कोरोनाची 65,002 प्रकरणे समोर आली होती, तर 996 रूग्णांचा मृत्यू झाला होता.
आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या 6 लाख 77 हजार 444 अॅक्टिव्ह केस आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 49 हजार 980 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 18 लाख 62 हजार 258 लोक बरे झाले आहेत. देशात सर्वात जास्त प्रभावित महाराष्ट्र असल्याचे दिसत आहे