पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पुणे सीबीआय विशेष कोर्टाने पाच आरोपींपैकी तीन आरोपींची निर्दोष सुटका केली. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. सीबीआय कोर्टाने डॉ. वीरेंद्र तावडे, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल ११ वर्षानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील निकाल आज जाहीर झाला आहे.
या प्रकरणातील आरोपी वीरेंद्रसिंह तावडेवर कट रचल्याचा आरोप होता, परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच, पुनाळेकर आणि भावे विरोधातही आरोप सिद्ध होत नाही, त्यामुळे त्यांनाही निर्दोष ठरवले गेले आहे. कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचे सिद्ध होत असल्याने दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी, बचावपक्षाचे वकील प्रकश साळशिंगेकर, सीबीआयचे तपास अधिकारी, आरोपी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे कोर्टात उपस्थित होते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येनंतर गोविंद पानसरे, कर्नाटकात प्राध्यापक एमएम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली.
अगदी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेचा तपास होण्यासाठी सुरुवातीलाच चुकीच्या दिशेने झाला. या हत्येचा तपास जेव्हा पुणे पोलिसांकडून करण्यात येत होता तेव्हा त्यांनी चुकीच्या आरोपींना ताब्यात घेतले गेले. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे गेला.
सीबीआयकडून देखील या प्रकरणात चुकीच्या दिशेने तपास झाल्याचे समोर आले. कारण सीबीआयने कोर्टात दावा केला होती सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी दाभोळकरांची हत्या केली.
कॉम्रेड पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास कर्नाटक एसआयटीकडून करण्यात येत होता. त्या तपासाच्या दरम्यान कर्नाटक एसआयटीच्या निदर्शनास आले की, हे हत्याकांड करणारा गट एकच आहे. त्यामुळे कर्नाटक एसआयटीच्या तपासामधून उलघडा झाला की दाभोळकरांची हत्या ही शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनी केली आहे.
पण हा सगळा उलघडा होण्यासाठी २०१८ उजाडले. त्यामुळे सुरुवातीची पाच वर्ष हा तपास चुकीच्या दिशेने होत असल्याने या प्रकरणाचा खटलाच उभा राहिला नाही.
डॉ. नरेंद्र दाभोळकर नेहमीप्रमाणे २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात मॉर्निंग वॉकला गेले होते. मॉर्निंग वॉक ओटोपून घरी जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांची अगदी जवळून गोळ्या झाडून हत्या केली. पुण्यातील विठ्ठल रामजी पुलावर दाभोळकरांची हत्या करण्यात आली होती. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे अशी मारेकऱ्यांची नावे असल्याचे अगदी शेवटच्या तपासातून पुढे आले.
या दोघांनी पाठिमागून दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या. ज्यात एक गोळी डॉ. दाभोलकरांच्या छातीत दुसरी डोक्यात गेली होती. दाभोलकरांच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली होती. ही सर्व घटना या पुलावर सफाई काम करणाऱ्या दोघांनी आणि इतर काही लोकांनी प्रत्यक्षात पाहिली होती.
दाभोलकरांच्या हत्येनंतर कॉम्रेड गोविंद पानसरे (२०१५), एम.एम कलबुर्गी (२०१५) आणि पत्रकार गौरी लंकेश (२०१७) यांचीही अश्याचप्रकारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या सर्व हत्या एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत, याचा तपास अजुनही सुरूच आहे.