पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाचा निकाल उद्या दिनांक १० मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. या खटल्यात पाच आरोपींवर आरोप निश्चिती केली आहे. या खून प्रकरणाचा तपास सुरुवातीला पुणे पोलिस, त्यानंतर एसटीस आणि शेवटी सीबीआयने केला आहे. या गुन्ह्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर १५ सप्टेंबर २०२१ रोजी आरोप निश्चित करण्यात आले.
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला सकाळी 7.30 च्या सुमारास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अतिशय जवळून पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली होती. यामध्ये दाभोलकर यांचा जागीच मृत्यू झाला होता.
तावडे, अंदुरे, कळसकर आणि भावे यांच्यावर भारतीय दंडसंहिता (भादंवि) कलम ३०२ (हत्या), १२० (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), ३४ नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी सध्या जामिनावर आहेत.
सुरुवातीला या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरु होती. त्यानंतर न्यायाधीश नावंदर यांची बदली झाल्याने सध्या पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे. न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्यासमोर खटल्याचे कामकाज पूर्ण झाले. त्यांनी १० मे रोजी निकाल देण्याचे सुतोवाच केले होते.
दाभोलकर यांच्या खुनानंतर आठ वर्षांनी पुण्याच्या विशेष न्यायालयात खटला सुरु झाला. न्यायाधीश सत्यनारायण मुंदडा यांच्या नेतृत्वात १५ सप्टेंबर २०२१ रोजी याप्रकरणी खटला सुरु झाला. याप्रकरणी वीस साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळसिंगीकर, ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ॲड. सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले. त्यांनी दोन साक्षीदार न्यायालयात हजर केले होते.
बंगळूरमध्ये पत्रकार गौरी लंकेश खुनप्रकारणी कर्नाटक एटीएसने चिंचवडहून अमोल काळे याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून नालासोपारा येथील वैभव राऊत याचे धागेदोरे मिळाले. त्याच्या घरातून पोलिसांनी शस्त्रांचा आणि स्फोटकांचा साठा जप्त केला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्याआधारे पोलिसांनी शरद कळसकरला अटक केली. त्याने सचिन अंदुरेच्या मदतीने डॉ. दाभोलकर यांचा खून केल्याची कबुली दिली आहे.
नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाचा घटनाक्रम
२० ऑगस्ट २०१३ – डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांची शिंदे पुलावर हत्या
३० ऑगस्ट २०१३- सुमारे आठ कोटी फोन कॉल्स व ई मेल्सची तपासणी
२ सप्टेंबर २०१३ – रेखाचित्र तयार व १७ संशयित ताब्यात
१९ डिसेंबर २०१३ – गुन्ह्यात शस्त्रे पुरवल्याबद्दल ठाण्याच्या मनीष नागोरी व विकास खंडेलवाल याना अटक
१३ मार्च २०१३ – नागोरी व खंडेलवाल यांची ओळखपरेड
९ मे २०१४ – केंद्रीय गुप्तचर विभागाकडे तपास वर्ग
३१ डिसेंबर २०१६ – सनातन प्रभातच्या डॉ. वीरेंद्र तावडेच्या व पुण्याच्या सारंग अकोलकरच्या घरावर छापे
११ जून २०१६ – डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक
१४ जून २०१६ – या गुन्ह्याचा सूत्रधार तावडे असल्याचा ‘सीबीआय’ चा न्यायालयात दावा
३० नोव्हेंबर २०१६ – वीरेंद्र तावडेंविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
२१ मे २०१८ – पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनाप्रकरणी कर्नाटक पोलिसांकडून अमोल काळेला अटक
६ जुलै २०१८- न्यायालयाने तावडेचा जमीन फेटाळला
१० ऑगस्ट २०१८ – दहशतवाद प्रतिबंधक विभागाकडून (एटीएस) मुंबईतून सुधन्वा गोंधळेकर, वैभव राऊत, शरद काळे यांना अटक
१८ ऑगस्ट १८ – ‘एटीएस’ ने सोडून दिलेल्या सचिन अंदुरेला सीबीआयकडून अटक
३१ ऑगस्ट २०१८ – अमित दिगवेकर व राजेश बंगेरा यांना सीबीआयकसून अटक
४ आकटोबर २०१८ – डॉ. दाभोलकर यांच्यावर शरद कळसकर यानेच गोळी झाडल्याचा सीबीआय चा दावा
१५ सप्टेंबर २०१८ – डॉ. तावडे यांच्यासह पाचजणांविरुद्ध न्यायालयात दोषारोप निश्चित