बेगळुरू : फेसबुक या सोशल मीडिया साइटवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे हिंसाचार उसळला. हिंसक जमावाने काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर हल्ला केला तसेच त्यांच्या घरावर दगडफेक केली. यानंतर परिसरात जाळपोळ करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच दाखल झालेल्या पोलिसांवरदेखील जमावाने हल्ला केला, यानंतर पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात 2 जण ठार झाले तर जमावाच्या हल्ल्यात 60 पोलीस जखमी झाले.
दरम्यान, ज्या फेसबुक अकाऊंटवरून वादग्रस्त पोस्ट करण्यात आल्या ते समाजकंटकांनी हॅक केले होते, असे पोलिसांनी सांगितले. हे फेसबुक अकाऊंट काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या पुतण्याचे आहे. काल रात्री या पोस्टमुळे एक जमाव हिंसक झाला. रात्रीच्या सुमारास जमावाने मूर्तीं यांच्या घरावर दगडफेक केली. पोलीस या ठिकाणी पोहचले असता जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. नंतर परिसरात जाळपोळ करण्यास सुरूवात केली.
जमावाने के. जे. हाली पोलीस ठाण्यावर सुद्धा हल्ला केला. दंगलीची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहेत. यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे बंगळुरू शहर पोलीस सहआयुक्त संदीप पाटील यांनी महटले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंगळुरूत कलम 144 लागू केले असून डी. जे. हल्ली आणि के. जे. हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लागू केला आहे.
घटनेनंतर या भागात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. या प्रकरणी 30 जणांना अटक केली असल्याचे पोलीस सहआयुक्त पाटील यांनी सांगितले. पोलिस आणखी काही दंगलखोरांचा शोध घेत आहेत.