Gold Price : सोने होऊ शकते आता आणखी स्वस्त, ‘ऑल टाइम हाय’वरून 4281 रुपयांपर्यंत घसरले

नवी दिल्ली : रशियाने कोरोना व्हायरसवरील वॅक्सीनची घोषणा केल्यानंतर सोने-चांदीच्या किमतीमध्ये सतत घसरण दिसून येत आहे. तर, डब्ल्यूएचओने उपस्थित केलेले प्रश्न आणि डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने सोन्याच्या भावात या आठवड्यात खुप चढ-उतार दिसून येत आहेत. 21 ऑगस्टला सोने 346 रुपये स्वस्त होऊन 51973 रुपयांवर बंद झाले. 17 ते 21 ऑगस्टच्या दरम्यान 5 व्यवसायिक दिवसात सोने 901 रुपये आणि चांदी 1660 रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहे.

आता आणखी स्वस्त होऊ शकते सोने
अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरीबाबत चांगली अपेक्षा व्यक्त केली आहे. या कारणामुळे अमेरिकन डॉलरमध्ये मोठ्या घसरणीनंतर आता सुधारणा दिसत आहे. याचा परिणाम बुलियन मार्केट म्हणजे सोने आणि चांदीच्या किंमतीवर दिसत आहे. बाजार जाणकारांचे म्हणणे आहे की, आगामी दिवसात सोन्याच्या किमती आणखी खाली येऊ शकतात. अमेरिकन डॉलरमधील मजबूतीचा परिणाम सोन्यावर दिसणार आहे. सोबतच, जगभरात पुन्हा गुंतवणूकदारांनी शेयर बाजाराकडे आपला मोर्चा वळवला आहे.

उच्च स्तरावरून 4281 रुपयांपर्यंत घसरले आहे सोने
सराफा बाजारात सोन्याचा भाव आपल्या उच्च स्तरावरून 4281 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला आहे. 7 ऑगस्टला सोने 56126 रुपयांवर बंद झाले होते. या दिवशी सकाळी त्याने ऑलटाइम हाय रेकॉर्ड स्थापन करत 56254 रुपयांवर उघडला होता. या दरम्यान चांदी 8639 रुपये प्रति किलोग्रॅमने उतरली. सात ऑगस्टला चांदी 75013 रुपये प्रति किलोग्रॅमच्या दरावर बंद झाली होती.