नवी दिल्ली : कोरोना महामारीदरम्यान अतिशय वाईट प्रकारे कोसळलेल्या ऑफिस स्पेस सेक्टरने आता पुन्हा उसळी घेतली आहे. वर्क फ्रॉम होम बंद केल्यानंतर आता कंपन्या कर्मचाऱ्यांना परत बोलावत आहेत. यामुळे ऑफिस स्पेसची जास्त आवश्यकता भासत आहे. एका रिपोर्टनुसार, देशातील ८ मोठ्या शहरात २०२४ च्या पहिल्या सहामाहीत ३४.७ मिलियन स्क्वेअर फूट ऑफिस स्पेसची खरेदी-विक्री झाली आहे.
कोणत्याही सहामाहीतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. रिपोर्टनुसार, या कालावधीत ट्रांजक्शनमध्ये ३३ टक्के वार्षिक वाढ झाली आहे. २०२३ च्या पहिल्या सहामाहीत २६.१ मिलियन स्क्वेअर फूट जागांचे व्यवहार झाले होते.
नाईट फ्रँक इंडियाच्या रिपोर्टमध्ये, जानेवारी ते जून, २०२४ कालावधीत आठ प्रमुख शहरात हौसिंग आणि ऑफिस स्पेसच्या कामगिरीचे विस्तृत विश्लेषण केले आहे. बेंगळुरुमध्ये सर्वात जास्त ८.४ मिलियन स्क्वेअर फूटचे व्यवहार झाले आहेत. हे टॉप ८ मेट्रो सिटीच्या एकुण व्यवहारांच्या २६ टक्के आहे.
मुंबईत ५.८ मिलियन स्केअर फूट आणि दिल्ली एनसीआरमध्ये ५.७ मिलियन स्क्वेअर फूट ऑफिस स्पेसचे व्यवहार झाले आहेत. अहमदाबादने मागील वर्षाच्या तुलनेत २१८ टक्के सर्वात जास्त मजबूत ग्रोथ प्राप्त केली आहे. केवळ चेन्नई एकमेव असे शहर आहे, जिथे ऑफिस स्पेसच्या खरेदी-विक्रीचे प्रमाण कमी दिसून आले.