मुंबई : स्वातंत्र्याचे प्रदीर्घ काळ उराशी बाळगलेले स्वप्न आजच्या दिवशी साकार झाल्याने १५ ऑगस्ट हा दिवस आपल्यासाठी पवित्र आहे. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली अशा महान व्यक्तींचे आदराने स्मरण करणे हे आपले पवित्र कर्तव्य ठरते. स्वातंत्र्यासाठी आपण आधी मुघलांविरुद्ध प्रदीर्घ काळ व नंतर ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्ध निकराने लढा दिला. पण आपली दुर्बलता अशी होती की, आपण संघटित नव्हतो, आपल्यात राष्ट्रीय एकात्मतेची भावना नव्हती, एक राष्ट्र या संकल्पनेची आपल्याला जाणीव नव्हती, देशपातळीवर त्यासाठी कोणतेही आंदोलन नव्हते किंवा कोणतीही निश्चित दिशा नव्हती.
इतिहासाच्या अशा अत्यंत निर्णायक वळणावर देशाच्या राजकीय क्षितिजावर महात्मा गांधींचा उदय झाला. त्यांच्या नेतृत्वाने सर्व वर्गांच्या, धर्मांच्या, वंशांच्या व विचारांच्या नागरिकांमध्ये आत्मविश्वास चेतविला गेला. गांधीजींनी अहिंसेचे तत्त्व स्वीकारून लोकांचे नेतृत्व केले. माणसाचे खरे सामर्थ्य शारीरिक ताकदीत नसते, तर दुर्दम्य इच्छाशक्तीत असते हे त्यांनी लोकांना स्वत:च्या उदाहरणाने पटवून दिले. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यासह इतरही अनेक थोर नेते त्या काळात उदयास आले.
स्वातंत्र्यानंतर देशाचे जे संविधान तयार झाले त्याचे मुख्य शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याची जोड दिल्याखेरीज देशातील कोट्यवधी लोकांचा खरा उत्कर्ष साधता येणार नाही यावर जवाहरलाल नेहरू यांचा भर होता. डॉ. आंबेडकरांनी राजकीय लोकशाहीसोबतच सामाजिक लोकशाहीचाही आग्रह धरला. समानतेशिवाय स्वातंत्र्य व्यर्थ आहे व स्वातंत्र्याशिवाय समानता शक्य नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले होते. राज्यघटनेत त्यांनी याचाच समावेश केला.