पेण (राजेश प्रधान) : पेण तालुक्यातील कासू या गावातील प्राचीन व सुप्रसिद्ध हनुमान मंदिराच्या सभामंडपाकरिता जेएसडब्ल्यू स्टील या कंपनीच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक नरेश गावंड यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
पेण तालुक्यातील कासू या गावातील प्राचीन व सुप्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले या मंदिरात ७ दिवस हनुमान जयंतीचा कार्यक्रम करण्यात येतो. याकरिता हजारो हनुमान भक्त उपस्थित राहतात. या भक्तांना या सभा मंडपाचा लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे गावातील महिला बचत गटांच्या सभा, सामाजिक उपक्रमे, हरिनाम सप्ताह व इतर धार्मिक कार्यकर्ता या सभा मंडपाचा उपयोग ग्रामस्थांना होणार आहे. नुकतच या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
हनुमान मंदिरासमोर सभा मंडप व्हावे याकरिता शिवसेना जिल्हा समन्वयक नरेश गावंड तथा माजी पंचायत समिती सदस्य यांनी जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या सीएसआर विभागाशी संपर्क साधून पाठपुरावा केल्याने कंपनीने हनुमान मंदिर सभा मंडपाकरिता ७ लाख २० हजारांचा निधी मंजूर केला आहे. या कामी सुधीर तेलॉंग त्यांचे सहकार्य लाभल्याचे गावंड यांनी सांगितले
या भूमिपूजन प्रसंगी माजी उप सरपंच तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख जयराज तांडेल, कासू सरपंच अकाश नाईक ग्रामपंचायत सदस्या ज्योत्स्ना शिंदे, उप सरपंच महानंदा जयराज तांडेल, ग्रामसेवक पाटील, कासू शाखाप्रमुख हिरामण तांडेल, निकेत गावंड यांच्यासह ग्रामस्थ आणि महिलावर्ग उपस्थित होते.