मुंबई : MPSC ची दि. 20 सप्टेंबर रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा केंद्राबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या परिक्षा आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेण्यात येणार आहेत.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्या वतीने चर्चा करण्यात आली. यावेळी करोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहोचणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना केली.
ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पुढाकार घेऊन परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची अडचण दूर केल्याने राज्याच्या सर्व विभागातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.