Mumbai-Goa Highway : पाठुन आले समृध्दी झाले मात्र कोकण महामार्गाचे घोडे अजुनही अडले!

goa-road-1
माणगांव (रविंद्र कुवेसकर) : आपला रायगड व कोकणातील महामार्ग इंदापूर ते पळस्पे नवीन निघालेल्या निविदां (टेंडर ) प्रमाणे दिघी पोर्ट वाहतूक, रोहा, माणगांव विळे भागाड, महाड पंचतारांकित औद्योगिक वसाहती, अलिबागलाही असलेले भविष्यातील येणारे नवीन प्रकल्प, येथिल आकर्षक पर्यटनक्षेत्र यामुळे पर्यटकांची, नविन कंपन्यांची व्यावसायिक मोठी वर्दळ दळणवळणही निश्चित वाढणार. ही गरज लक्षात घेता आता येथिल लोकं म्हणतात पाठुन आले समृध्दी झाले मात्र कोकण महामार्गाचे घोडे अजुनही अडले. (समृध्दी महामार्गाचे लोकार्पण झाले हों !) आता हा कोकणचा महामार्ग चारपदरी नको तो एकदाच काय तो सरळ सहा पदरीच करणे गरजेचे झाले आहे.
कारण एकतर याचे बांधकाम आधीच बेहिशोबी रखडले. लोकांचे मणके, कणा, हाड खिळखीळी झाली. अनेकांना अपघाती अपंगत्व आले, अनेकांनी आपले प्राण ही गमावले. अनेक घरातील तरुणकर्ते पुरुष गमावले, कुटुंबांचे स्वप्न भंगले. म्हणुनच आता कोकणचा महामार्ग एकदाच काय तो सहापदरी करा ! असा जन आक्रोश होत आहे. हे करणे शक्य आहे फक्त सहापदरी रस्त्यासाठी वाढीव निधी तेवढा मंजुर करावा लागेल. व महत्वाचे असे कि या महामार्गासाठी सहापदरी होईल इतकी जमिनही संपादीत केली गेली. व जवळपास या मार्गावरील सर्व ब्रिज ( पुल ) सहापदरी असल्याचेच समजते.
एकतर एका तपाहुन प्रदिर्घ कालावधी संपला पण महामार्ग काही मार्गी लावता आला नाही. हे राजकिय ईच्छा-शक्तीचे मोठे निर्लज्ज अपयश आहे. स्वतःला मोठे म्हणवुन घेणारे नेते देखील या महामार्गाविषयी लोकांची दररोज दिशाभूल करीत विकासाची गाजरं दाखवत आहेत. असं म्हणने आता वावगे ठरु नये. या लोकांना जनाची नाही पण मनाची तरी वाटत असेल कि नाही ? अशी बिकट अवस्था आहे. राजकारण, सत्ता, पैसा आणि ठेकेदारी भ्रष्टाचारात महामार्ग इतका बरबटला, गुरफटला आहे कि ही भ्रष्टाचाराची जळमट कोण दूर करणार ? असा सवाल ऐरणीवर आला आहे.
यामुळे जनतेसाठीचा विकास मात्र कायमचा हरवला आहे. दर सणावारात पाठीचा कणा झिजवत कोकणात येणारे चाकरमानी, आबालवृध्द, महिला पुरुष सर्वच हैराण आहेत. पण आईची शपथं एकालाही त्याचे सोयर सुतक उरले नाही. संवेदनाहिनतेची परिसिमा ओलांडुन महामार्गाच्या आक्रोशाचा आर्त आवाज कुठेतरी खोलवर दाबला आहे. अशा प्रकारचे संतप्त जनमत झाले आहे. देशाचे लाडके नेते रोडकरी, नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण इकडेही कोकणाकडे अधुन मधुन एकतरी कटाक्ष टाकावा! अशी जनतेची हतबल मागणी आहे. अजुन वेळ घ्या, पण एकदाचा भविष्याचे दृष्टीकोनातुन चार नको, आता सहा पदरीच पूर्ण करा! अस जनमत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *