पेण अमली पदार्थाचे आगार, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले विष, आठवीतल्या मुलाने आपल्याच मित्राला संपवलं, धक्कादायक घटना!

पेण : पेणमधील अमली पदार्थ विक्रीचे दुष्परिणाम आता शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. पेण शहरातील एका शाळेतील एका विद्यार्थ्याने अमली पदार्थाच्या नशेत आपल्याच मित्राची हत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मित्राने आपल्या कमी अमली पदार्थ दिल्याच्या रागातून हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यातून पेणमध्ये अमली पदार्थाचा बेकायदेशीर धंदा किती फो फावला आहे हे देखील उघड झाले असून पेण पोलिस याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. इथं आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आपल्याच वर्गातील मुलाची निर्घृण हत्या केली आहे. अमली पदार्थांचं सेवन करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपीनं आपल्या वर्गमित्राला संपवलं आहे. हत्येनंतर आरोपीनं आपल्या मित्राचा मृतदेह एका झाडीत टाकला होता. पण पेण पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेत त्याला बालसुधारगृहात पाठवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा आणि पीडित मुलगा अनेकदा शाळेला दांडी मारायचे. दोघांना अमली पदार्थांचं व्यसन लागलं होतं. शाळा बुडवून दोघंही निर्जनस्थळी जाऊन अमली पदार्थाचं सेवन करायचे. घटनेच्या दिवशी पीडित मुलानं आरोपीपेक्षा जास्त अमली पदार्थाचं सेवन केलं. आपल्या वाट्याचे अमली पदार्थ मित्राने घेतल्याने आरोपीचा पारा चढला. यातून त्याने अवजड वस्तूने मित्रावर हल्ला केला.
डोक्याला जबर मार लागल्याने या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. मित्राची हत्या केल्यानंतर आरोपीनं त्याचा मृतदेह एका झाडीत टाकून घटनास्थळावरून पळ काढला. पण परिसरातील काही जणांना या विद्यार्थ्याचा मृतदेह दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. ही हत्या कुणी आणि का केली? याची उकल करण्याचं मोठं आव्हान पेण पोलिसांसमोर होतं.
पण पेण पोलिसांनी अवघ्या काही तासांत हत्येची उकल केली आहे. पोलिसांनी आसपासच्या परिसरातील 50 सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हत्येचा उलगडा केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, अमली पदार्थावरून दोघांमध्ये वाद झाला आणि यातून ही हत्या झाल्याचं पोलिसांना समजलं आहे. आरोपी मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी मृत मुलाच्या मित्रांकडे चौकशी केली असतो, मृत मुलगा अनेकदा शाळा बुडवून आरोपीसोबत अमली पदार्थांचं सेवन करायला जात असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

(AI Image in news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *