PHOTO : सर्व अभ्यासक्रमात स्वभावदोष निर्मुलन प्रक्रिया शिकवणे गरजेचे, डॉ. जयंत आठवले यांचे मत, गुरूपौर्णिमेनिमित्त शेकडो धर्मप्रेमींनी घेतला व्हिडिओ मार्गदर्शनाचा लाभ
PHOTO : सर्व अभ्यासक्रमात स्वभावदोष निर्मुलन प्रक्रिया शिकवणे गरजेचे, डॉ. जयंत आठवले यांचे मत, गुरूपौर्णिमेनिमित्त शेकडो धर्मप्रेमींनी घेतला व्हिडिओ मार्गदर्शनाचा लाभ
पुणे : सनातनचे सर्व साधक अहंभाव आणि स्वभावदोष निर्मुलनाची प्रक्रिया राबवतात. प्रत्येक अभ्यासक्रमात ही प्रक्रिया शिकवली गेली पाहिजे, मग ते वैद्यकीय शिक्षण असो की अभियांत्रिकी. त्याचे चांगले परिणाम वैयक्तिक पातळीवर तसेच समाजात दिसून येतील, असे मत सनातन संस्थेचे संस्थापक, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी एका मार्गदर्शनपर व्हिडिओत व्यक्त केले. हा व्हिडिओ धायरी फाटा येथील गुरूपौर्णिमा महोत्सवात उपस्थितांना दाखविण्यात आला.
सनातनच्या गोवा येथील आश्रमात काही दिवसांपूर्वी संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी डॉ. जयंत आठवले यांची भेट घेतली होती. त्यावेळी डॉ. आठवले यांनी कलावंतांना केलेल्या मार्गदर्शनाचा व्हिडिओ धायरीफाटा येथील धारेश्वर बँक्वेट हॉल येथे पार पडलेल्या गुरूपौर्णिमा महोत्सवात दाखविण्यात आला. त्याचा लाभ उपस्थित शेकडो धर्मप्रेमी नागरिक आणि साधकांनी घेतला.
डॉ. आठवले यांनी म्हटले की, कला असो की इतर क्षेत्र, मनात अहंभाव येऊ शकतो, अशावेळी दोषांवर मात करायची असेल तर सनातन संस्था राबवत असलेल्या अहंभाव निर्मुलन, स्वभावदोष निर्मुलन प्रक्रिया राबविली पाहिजे.
या व्हिडिओत ते पुढे म्हणाले की, ईश्वरप्राप्तीसाठी असे दोष दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. पंचमहाभूतांच्या पलिकडे इश्वर आहे, तिथपर्यंत पोहोचायचे असेल तर व्यष्टी आणि समष्टी साधना आवश्यक आहे.
व्यष्टी आणि समष्टी साधनेची माहिती देताना ते म्हणाले, वैयक्तिक अध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाची साधना म्हणजे व्यष्टी होय. तर समाजाच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाची साधना म्हणजे समष्टी होय.
उपस्थित कलाकारांना मार्गदर्शन करताना डॉ. आठवले या व्हिडिओत पुढे म्हणतात की, सनातनचे साधक सतत नामजप करतात, त्यामुळेच त्यांच्या अडचणी दूर होतात, अथवा त्यांची तीव्रता कमी होते.
या महोत्सवात सनातनच्या साधक सौ. मंगला सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या साधना मार्गातील अनुभवांचे कथन केले. सौ. सहस्त्रबुद्धे म्हणाल्या की, सनातन संस्थेत आल्यामुळेच मला नामजप मिळाला. पुढे याच नामजपातून अनुभूती येऊ लागल्या, साधनेचे महत्व समजले.
सौ. सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, प्रक्रिया प्रामाणिकपणे आणि गुरूदेवांवर श्रद्धा ठेवून राबविल्यास दोषांवर सहज मात करता येते, अथवा त्यांची तीव्रता कमी करता येते. दरम्यान, सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या साधना मार्गातील विविध अनुभवांचे कथन यावेळी केले.
यानंतर अधिवक्ता सौ. मृणाल व्यवहारे-साखरे यांनी हिंदुत्वावर आपले विचार मांडले. तसेच हिंदुधर्मासमोरील समस्या मांडल्या. त्या म्हणाल्या, जेव्हा-जेव्हा धर्माचा मुद्दा येतो, तेव्हा मी प्रथम एक हिंदूधर्माची कार्यकर्ता असते. प्रत्येकाने हिंदु धर्माचा कार्यकर्ता झाले पाहिजे.
यानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हिंदु धर्मातील गुरू-शिष्य परंपरेचे महत्व सांगताना ते म्हणाले की, गुरूंचे स्थान हे सर्वात महत्वाचे आहे, कारण गुरूंच्या माध्यमातूनच आपल्याला ईश्वर भेटतात. खरा आनंद हा अध्यात्मात आहे. आनंदी राहायचे असेल तर अध्यात्मिक प्रगती आवश्यक आहे, त्यासाठी साधना केली पाहिजे.
नागेश जोशी पुढे म्हणाले की, वाल्मिकींनी नामजपाच्या बळावर रामायण लिहिले, म्हणूनच नामयज्ञ सर्वश्रेष्ठ आहे. नामजपाने अध्यात्मिक उर्जा मिळते. सर्वांनी कुलदेवतेचा आणि त्यानंतर श्री गुरूदेव दत्त हा नामजप केला पाहिजे, यामुळे वाईट प्रारब्ध नष्ट होतात. अध्यात्मिक तत्व वाढतात, प्रगती होते. तसेच प्रत्येकाने स्वभावदोष दूर केले पाहिजेत, त्यासाठी स्वभावदोष निर्मुलन प्रक्रिया राबविली पाहिजे.
यावेळी नागेश जोशी यांनी उपस्थितांना गुरूपौर्णिमेचे महत्व, इश्वर प्राप्तीसाठी साधनेचे महत्व आणि परिणाम, नामजपाचे महत्व आणि तो कसा करावा, स्वभावदोष निर्मुलन प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर सनातनच्या तरूण साधकांनी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके करून दाखवली.
तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरूवातीला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गुरूपौर्णिमेचा संदेश डॉ. ज्योती काळे यांनी उपस्थितांना वाचून दाखवला.
कार्यक्रमात धारेश्वर बँक्वेट हॉलच्या मालकांचे स्वागत करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सोपानकाका चव्हाण, भाजपाचे सारंग नवले, अभिरूची मॉलचे सतिश भिडे, शिवसेनेचे भरतदादा कुंभारकर, शेखर सातुसकर, कमलेश राजपुरोहित इत्यादी मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले.
या सोहळ्यात सभागृहाच्या बाहेर सनातनच्या साधकांनी विविध प्रकारचे स्टॉल लावले होते. सनातन संस्थेची विविध उत्पादने, धार्मिक ग्रंथ, प्रथमोपचार माहिती, देवघर माहिती, वृत्तपत्र आदि स्टॉलवर उपस्थित धर्मप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
सायंकाळी साडेपाच वाजता सुरू झालेला हा गुरूपौर्णिमा महोत्सव रात्रौ साडेआठपर्यंत उत्साहात सुरू होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक सोनावणे यांनी केले. सभागृहातील पवित्र, चैतन्यमय असे वातावरण सर्वांनाच अध्यात्मिक आनंद देणारे होते.