पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायती बिनविरोध जाहिर झाल्यानंतर उर्वरित सात ग्रामपंचायतींसाठी येत्या रविवार दि.18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होऊ घातले आहे. उमरठ या ऐतिहासिक पर्यटनस्थळी सरपंच आणि सदस्यपद रिक्त असतानाही ग्रामपंचायत बिनविरोध जाहिर झाली आहे तर लोहारेमध्ये नऊ सदस्य बिनविरोध जाहिर झाले असताना फक्त सरपंच पदासाठी निवडणूक जाहिर झाली आहे.
उर्वरित भोगाव खुर्द, बोरघर, चांभारगणी बुद्रुक, दिविल, कालवली, कापडे खुर्द या सहा ग्रामपंचायतींमध्येदेखील निवडणूक रंगतदार होणार असून सर्वत्र महाविकास आघाडी आणि बाळासाहेबांची शिवसेना, तसेच काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवारदेखील भवितव्य आजमावित असल्याने या लढती रंगतदार होणार आहेत.
पोलादपूर तालुक्यातील कालवली ग्रामपंचायतीमध्ये शेकापक्षाचे योगेश महाडीक हे सरपंचपदासाठी उमेदवारी करीत असून किरण पवार हे यावेळी त्यांच्याविरोधात लढत देत आहेत. मागीलवेळी शेकापक्षाचे योगेश महाडीक यांना विजयाने थोडक्यात हुलकावणी दिल्यानंतर पुन्हा पूर्ण तयारीनिशी शेकापक्षाने याठिकाणी लढत देण्याचे ठरविले आहे.
या ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 1 चे प्रियंका पार्टे, सविता भोसले आणि गणपत शिंदे हे बिनविरोध निवडून आले असून प्रभाग 2 मध्ये दीपक कळंबे, रंजना सकपाळ, बाबाराम महाडीक आणि समिक्षा सकपाळ हे दोन सदस्यपदांसाठी लढत देत आहेत. प्रभाग 3 मध्ये महामूद तिवडेकर आणि बेगम वलीले हे शेकापक्षाचे दोन उमेदवार बिनविरोध जाहिर झाले आहेत. गेल्या वेळेस शेकापक्षाने ‘काँटेकी टक्कर’ देऊनही निसटलेला विजय यावेळी दृष्टीपथात आणण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न सुरू असून शेकापक्षासोबत महाविकास आघाडीदेखील सक्रीय झालेली आहे. शेतकरी कामगार पक्षाने गुरूवारी काढलेली रॅली कालवली विशेष लक्षणीय ठरली आहे.
दिविल सरपंच पदासाठी दुहेरी लढत; तीन प्रभागांमध्ये बहुरंगी लढतीचे चित्र
पोलादपूर तालुक्यातील लोहारे पुलापलिकडील तुर्भे खोंडा, तुर्भे बुद्रुक, तुर्भे खुर्द आणि वझरवाडी या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पहिल्या टप्प्यामध्ये लागल्या असताना दिविल ही पाचवी ग्रामपंचायत दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडणुकीला सामोरी जात आहे. यामध्ये सरपंच पदासाठी गोपाळ चांढविकर विरूध्द सागर देवे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे.
प्रभाग 1 मध्ये 3 जागांसाठी रूपाली पवार, मंगेश जंगम, प्रमोद मोरे, मनिषा शिंदे, सविता सोनावणे, रंजना देवे, सुवर्णा भिलारे, राजश्री देवे आदी 8 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग 2 मध्ये विक्रम भिलारे, सविता कदम, पुष्पा जाधव, कृष्णा मोरे, सरिता थिटे, नामदेव भिलारे आदी सहा उमेदवार 2 सदस्यपदांसाठी रिंगणात आहेत. प्रभाग 3 मध्ये श्रध्दा चौधरी, राजू जंगम, अनिता भिलारे, नयन सुतार, रत्ना भिलारे आदी 5 उमेदवार 2 सदस्यांच्या जागेसाठी रिंगणात आहेत. दिविलमध्ये काँग्रेस,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे,भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना आदी पक्ष रिंगणात आहेत.
लोहारे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी; थेट लढत आणि नऊ सदस्य बिनविरोध
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोहारे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात सर्वात आधी हालचाली सुरू होऊन एक सरपंच पदाचा उमेदवार दीपक पवार आणि प्रभाग 1 मध्ये प्रतिभा सुर्वे, परशूराम नरे, श्रीकांत निकम, प्रभाग 2 मध्ये हरिश्चंद्र मांढरे,मनिषा साळवे, नारायण शेडगे,प्रभाग 3मध्ये चंदा पवार, सुषमा पवार संदेश नरे आदी नऊ सदस्यपदाचे उमेदवार बिनविरोध करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मात्र, अचानक समीर साळुंखे यांनी माहितीचा अधिकार तसेच उपोषणास्त्र वापरून ग्रामपंचायत लोहारेला सतत आव्हान दिल्यानंतर आता त्यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून बिनविरोध ग्रामपंचायतीच्या सुराला बेसूर करून सर्व तीनही प्रभागांमधील मतदारांना मतदान करण्याची संधी दिली. तथापि, लोहारे ग्रामपंचायतीचे सर्व नऊ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
भोगाव खुर्दमध्ये सरपंचपदाची चौरंगी लढत
पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग जात असलेल्या भोगाव खुर्द ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच आरक्षणासाठी प्रियंका कदम, प्रतिभा शेलार, ज्योती कदम आणि सीमा चिकणे यांच्यामध्ये चौरंगी लढत होणार आहे.
प्रभाग 1 मध्ये दोन जागांसाठी सुजाता कदम, निता निकम आणि अरूणा कदम यांच्यात तिरंगी होणार असून तिसऱ्या सदस्यपदासाठी सूर्यकांत कदम बिनविरोध निवडून आले. प्रभाग 2 मध्ये कुंदा चिकणे विरूध्द सीमा चिकणे अशी थेट लढत एका जागेसाठी होणार असून विष्णू काळप हे बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग 3मध्ये भारती पार्टे विरूध्द कविता नलावडे यांच्यात लढत होणार असून लहू पवार हे बिनविरोध निवडून आले आहेत.
धामणदिवी येथे सरपंच पदासाठी थेट लढत
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दरडीचा धोका असलेल्या धामणदिवी गावामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी अनिकेत वाडकर विरूध्द क्षमता बांद्रे अशी थेट लढत होणार आहे.
प्रभाग 1 मध्ये स्वप्नाली जाधव, वर्षा वाडकर, आर्या उफाळे, रंजना चव्हाण, अनिकेत वाडकर, नथूराम जाधव, प्रभाग 2 मध्ये भारती जाधव, करूणा बांद्रे यांच्यामध्ये लढत होणार असून रामदास कदम यांची दुसऱ्या जागेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग 3 मधील रामभाऊ रांगडे आणि प्रिया भावे हे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
चांभारगणी बुद्रुकमध्ये तीन जागा बिनविरोध; शिवसेना उध्दव ठाकरे पक्षामुळे लढत चुरशीची
पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावरील या चांभारगणी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पंधरावडयात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असंख्य ग्रामस्थांनी प्रवेश केल्यामुळे निवडणुकीतील लढत चुरशी होणार आहे. सरपंच पदासाठी सतीश गोळे आणि तानाजी पवार यांच्यामध्ये अटीतटीची लढत होणार आहे.
प्रभाग 1 मध्ये 3 जागांसाठी अनिता शिंदे, पुष्पा सोंडकर, अजय मुजुमले, सहदेव येरापले,शांताराम गोळे, राजेश कोंद्रे हे 6 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. प्रभाग 2 मध्ये 3 जागांसाठी मंदा बर्गे, मनिषा सलागरे, शैला तळेकर, द्रौपदी घोलप, गणेश तळेकर, सुधीर पार्टे हे 6 उमेदवार लढत देणार आहेत तर प्रभाग 3 मध्ये 3 जागांवर वैशाली पवार, सारिका जाधव आणि पांडूरंग दळवी हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
पोलादपूर तालुक्यातील दूर्गम आणि दरडग्रस्त ग्रामपंचायत बोरघरमध्ये यावेळी आदिवासी खेडेगांव होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या महादेवाचा मुरा गावाची भुमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. मागीलवेळी शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षांमध्ये समझोता होऊन सत्ता राखण्यात आली असताना यावेळी महादेवाचा मुरा महत्वपूर्ण ठरण्याची चिन्हे दिसून येत आहे. अनुसूचित जमातीचे आरक्षण असलेल्या सरपंच पदासाठी शेकापक्षातर्फे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर बंडू विठू पारधी सरपंच पदाचे उमेदवार असून सुनील गायकवाड हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सरपंच पदासाठी दावेदार आहेत.
प्रभाग 1 मध्ये मनिषा पारधी, अंजना मोरे, नामदेव पार्टे, चंदू पार्टे हे चार उमेदवार दोन जागांसाठी रिंगणात आहेत तर प्रभाग 2 मध्ये गीता गोगावले, अनिता तांबे, चंद्रभागा सणस, सुनंदा आंबले, निवृत्ती कदम आणि सचिन कदम असे तीन जागांसाठी 6 उमेदवार लढत देत आहेत. प्रभाग 3 मध्ये 2 जागांसाठी इंदूबाई उलालकर, चंद्राबाई उलालकर, नारायण उतेकर आणि कृष्णा गोगावले दोन जागांसाठी 4 उमेदवार लढत देत आहेत. महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर शेतकरी कामगार पक्षाने अनुसूचित जमातीचे आरक्षण असलेल्या सरपंच पदासाठी उमेदवार देऊन मोठे आव्हान निर्माण केले आहे. याठिकाणी शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मतदार एकमेकांविरोधात मतदान करण्याची शक्यता असल्याने निकाल कलाटणी देणारा लागणार आहे.
उमरठमध्ये सरपंच नामाप्र महिला रिक्त; 7 पैकी 6 सदस्यांची बिनविरोध निवड
पोलादपूर तालुक्यातील ऐतिहासिक पर्यटन क्षेत्र असलेल्या उमरठ या पर्यटनस्थळाच्या ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला उमेदवार न मिळाल्याने सरपंच पद रिक्त राहिले आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सात जागांपैकी संजय कळंबे, सावित्रीबाई कळंबे, रूपाली कळंबे, इंद्रजित कळंबे, संगिता खोराणे आणि जयराम मोरे या सहा सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. एका सदस्याचे आरक्षण अनुसुचित जमातीचा उमेदवार असूनही जातपडताळणीच्या दाखल्याअभावी सदरचे पद रिक्त राहिले आहे.